नगर शहर वकिल संघटनेच्या निवडणुकीत मतदार यादीवरुन वादंग निर्माण झाले आहे. मतदार यादीत शहराबाहेरील, जिल्ह्य़ातील इतर तालुक्यातील वकिलांची नावे असल्याच्या कारणावरुन हरकत घेण्यात आली आहे. निवडणुकीतील मतदार यादी दुरुस्त करावी, यादीतील शहराबाहेरील नावे वगळावीत अशी मागणी अध्यक्षपदाच्या बहुसंख्य उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. मतदार यादी दुरुस्त न झाल्यास बहिष्कार टाकत निवडणुकीतून माघार घेण्याचा पावित्रा निवडणूक रिंगणातील बहुतेक उमेदवारांनी घेतला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी संघटनेची उद्या (शुक्रवारी) दुपारी सभा आयोजित करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष मंगेश दिवाणे यांनी निर्णयासाठी उद्या सभा होणार असल्याची माहिती दिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व कार्यकारिणी पदासाठी संघटनेची २२ जानेवारीस निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन अशोक बार्शीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्याच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दरम्यान अध्यक्षपदाचे उमेदवार नवनाथ गर्जे वगळता शिवाजी कराळे, मुकुंद पाटील, किशोर गाडेकर, शेखर दरंदले, सुरेश ठोकळ व मुकुंद पाटील यांनी अध्यक्ष दिवाणे यांच्याकडे आज मतदार यादीस हरकत असणारा अर्ज दिला.
निवडणूक शहर वकिल संघटनेची आहे, परंतु त्यात राहुरी, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नेवासे, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे येथील मतदार आहेत. यादीतुन संघटनेचे सभासद असलेल्या अनेकांची नावे वगळली गेली आहेत, अनेकांचे पत्ते सापडत नाहीत, त्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे, निवडणुक जाहीर झाली तरी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही, ती उमेदवारांना मिळत नाही, निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पावती फाडुन सभासद होणारेही मतदानास पात्र ठरतात ही घटनेतील तरतुद बदलण्यासाठी एस. एच काकणी, प्रज्ञा हेंद्रे व गौरव मिरीकर यांची समिती संघटनेच्या सभेत स्थापन करण्यात आली होती, या समितीने कामकाजही सुरु केले होते. परंतु दुरुस्ती होण्यापुर्वीच निवडणुक जाहीर करण्यात आली, त्यामुळे मतदार यादीत दुरुस्ती न झाल्यास बहिष्कार म्हणुन निवडणुकीतुन माघार घेतली जाईल, असे अर्जात नमुद केल्याचे कराळे यांनी सांगितले. या भुमिकेस इतर पदांच्या उमेदवारांचाही पाठिंबा असल्याचे कारळे म्हणाले.
या अर्जावर दिवाणे, बार्शीकर, सी. जे. बोरुडे, भगवान औसरकर, गणेश आरे, रविंद्र चौधरी, सुनिल सुर्यवंशी, सुरेश कोहकडे, आर. जे. शिंदे, बाळासाहेब खटके आदींच्या उपस्थितीत सभा झाली. त्यात दिवाणे यांनी या अर्जावर निर्णय घेण्यासाठी संघटनेच्या सभासदांची उद्या सभा घेण्याचे जाहीर केले. मतदार यादीत शहराबाहेरील, जिल्ह्य़ातील सुमारे ४५० जणांची नावे असल्याचा अंदाज व्यक्त करत कराळे यांनी शहर संघटनेचा अध्यक्ष बाहेरील वकिल कसे ठरवू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला.