तत्कालीन पालिकेतील गैरव्यवहार, भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांची कार्यपद्धती सध्या येथे चर्चेचा विषय झाली आहे. पालकमंत्री गुलाब देवकर यांच्याविषयीची त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. शहरात काही दिवसांपासून एक पत्रक वाटले जात असून विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघातून नरेंद्र पाटील हे उमेदवारीच्या प्रयत्नात असल्याने देवकर यांच्याविषयी मवाळ भूमिका घेत असल्याचे म्हटले आहे.
पाटील यांनी तत्कालीन पालिकेतील बेकायदा, नियमबाह्य़ ठराव तसेच गैरव्यवहाराबद्दल सातत्याने विरोध नोंदविला आहे. अर्थात भ्रष्टाचार, गैरव्यवहार व आमदार सुरेश जैन यांच्या कारकिर्दीतील कारभाराबद्दल जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाकडे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी सातत्याने पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत.
पाटील हे साबळे यांना डावलून एकटय़ानेच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
घरकुल घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित पालकमंत्री देवकर यांना जळगाव न्यायालयात जामीन मिळाल्यावर पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान का दिले नाही, असा सवाल करण्यात आला असून केवळ सुरेश जैन यांना लक्ष्य करून देवकरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नसावा, असा संशयही व्यक्त केला गेला आहे.
घरकुल घोटाळ्याप्रकरणी मार्च महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीचा लाभ घेत नरेंद्र पाटील यांचा जळगाव शहर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण मदत मिळावी म्हणून देवकर यांच्याशी ते साटेलोटे करीत असल्याचा स्पष्ट आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था ताब्यात घ्यावी, संस्थेत भरण्यात येणाऱ्या १३० जागांमध्ये आपणांस लाभ व्हावा, हाही उद्देश पाटील यांचा असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा बँक, दूध फेडरेशन, महाफेड, स्टार्च प्रकल्प तसेच वसंत साखर कारखाना आदीमध्ये झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबद्दल उल्हास साबळे यांनी कायम तक्रारी केल्या आहेत. जळगावच्या खान्देश मिल गैरव्यवहाराचा पाठपुरावाही त्यांच्याकडून सुरू आहे. गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघड करण्याच्या प्रयत्नात श्रेय स्वत: लाटण्याचा पाटलांचा प्रयत्न होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.