महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना त्यांच्या पदाचा देण्यात आलेला कार्यभार बेकायदेशीर असून त्यांच्या कार्यकाळात अनेक गैरप्रकार झालेले असल्यामुळे त्यांना पालिकेतून त्वरित सेवामुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पाणीवापराबाबत पुणेकर माजलेत या विधानामुळे झुरमुरे यांना त्वरित शासनाच्या सेवेत परत पाठवावे, असा ठराव सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता झुरमुरे यांना अतिरिक्त आयुक्त या पदाचा जो कार्यभार देण्यात आला आहे तोही बेकायदेशीर असल्याची लेखी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. झुरमुरे हे भारतीय वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असून ते महापालिकेत वृक्ष संवर्धन अधिकारी या प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत. कोणत्याही राज्य पोलीस, भारतीय पोलीस व भारतीय वन विभाग या सेवेतील अधिकाऱ्यास भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) दर्जाप्राप्त समकक्ष अधिकार देऊ नयेत, असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. मुळातच, भारतीय वन विभागातील अधिकाऱ्याची नियुक्ती महापालिकेत करणे गरजेचे नव्हते. तशी नियुक्ती करून त्यानंतर त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला, अशी तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे.
महापालिकेतील झुरमुरे यांची कारकीर्द वादग्रस्त असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना वाईट वर्तणूक देणे, काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला काम देणे, मर्जीतील कंत्राटदारासाठी सोयीच्या अटी घालून निविदा प्रक्रिया राबवणे, विविध कामांमध्ये गैरप्रकार करणे आदी अनेक प्रकार त्यांच्याकडून घडले आहेत. त्यांना महापालिकेतून त्वरित सेवामुक्त करण्याचे आदेश आपण आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी बागवे यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
नरेश झुरमुरे यांची नियुक्ती बेकायदेशीर
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना त्यांच्या पदाचा देण्यात आलेला कार्यभार बेकायदेशीर असून त्यांच्या कार्यकाळात अनेक गैरप्रकार झालेले असल्यामुळे त्यांना पालिकेतून त्वरित सेवामुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
First published on: 20-12-2012 at 05:11 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh zurmure illegally appointed