‘मी पवित्र आत्मा आहे, मी शुद्ध आत्मा आहे’ या समर्पण ध्यान जपाचा संदेश नेवासे तीर्थक्षेत्राच्या पावन भूमीत आज सर्व भारतभर गेला. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानने आयोजित समर्पण ध्यान शिबिर आज त्रिमूर्ती संकुलाच्या मैदानावर संपन्न झाले. योगगुरू शिवकृपानंद (दांडी, गुजरात) यांचे देश-विदेशातील साधक यावेळी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे व अध्यक्षा सुमती घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात सजवलेल्या भव्य क्रीडा मैदानात पहाटे पाच ते सात या वेळेत स्वामी शिवकृपानंद यांच्या देश-विदेशातील साधकांनी ध्यानधारणा केली. शिबिराच्या समारोपप्रसंगी त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या उत्कर्षांसाठी हजारो साधकांनी एकसुरात प्रार्थना केली. शेवटी पसायदान झाले. नंतर सुमारे ५० हजार भाविकांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.