अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ४६ वे राष्ट्रीय अधिवेशन २८ ते ३० डिसेंबरदरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशात परिसंवाद, कथाकथन, एक सूर एक ताल असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवारी, २८ डिसेंबरला रात्री ८ वाजता अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला (मुंबई) कार्यकारी मंडळाची सभा होणार आहे. २९ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता चिटणीस पार्कवर ‘एक सूर एक ताल’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये १० हजार शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता विद्यार्थी आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये व्दारकानाथ लेले, डॉ. सुलभा शहा, डी.के. देशमुख, मोहन सावंत, सुभाष चौधरी विचार मांडतील. दुपारी १२ वाजता सद्यपरिस्थितीत अ.भा. साने गुरुजी कथामालेपुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये अवधुत म्हमाणे, जे.यू. ठाकरे, श्यामराव कराळे, अर्जुन कोकाटे, माधवराव वाबळे सहभागी होतील. दुपारी ३ वाजता हीरक महोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. हे अधिवेशन काँग्रेसनगरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. मा.म. गडकरी, डॉ. शरयू तायवाडे, शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर, ज.मो. अभ्यंकर, हर्षलता बुराडे, हर्षला साबळे व अखिल भारतीय साने गुरुजी  कथामालेचे (मुंबई) अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.   सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची ६० वर्षे: काय साधले काय राहिले? या विषयावर परिसंवाद होईल. रात्री ९ वाजता अ.भा. साने गुरुजी कथामाला (मुंबई) वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. ३० डिसेंबरला सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांकडून कथाकथन सादर केले जाईल. दुपारी १२ वाजता समारोप होणार आहे.