दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालकपद पुन्हा एकदा वादंगात सापडले असून, या पदावर विराजमान होण्यासाठी गुणवत्ता आणि सक्षमतेचा निकष महत्त्वाचा ठरणार की निवड समितीची विशेष शिफारस याकडे सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे. आधीच हे राष्ट्रीय नाटय़विद्यालय राजकारणाचा अड्डा झाल्याची चर्चा जोरात असताना आणि येथील नाटय़प्रशिक्षणाचा दर्जा खालावल्याची सार्वत्रिक भावना असताना या संस्थेच्या संचालकपदी अध्यापन क्षमता आणि नाटय़कर्तृत्वाचा निकष न लावताच एखाद्याची वर्णी लावली गेली तर एनएसडी रसातळाला जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या मुंबई विद्यापीठातील नाटय़शास्त्र विभागाचे संचालक असलेले नाटय़-दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे, बंगलुरू येथील ‘रंगशंकरा’ संस्थेच्या सर्वेसर्वा अभिनेत्री अरुंधती नाग आणि एनएसडीतील प्राध्यापक अब्दुल लतीफ खराना या तिघांची नावे संचालकपदासाठीच्या अंतिम यादीत विचारार्थ आहेत. पैकी प्रा. वामन केंद्रे यांचे नाव गेल्या वेळीही एनएसडीच्या संचालकपदासाठी अंतिम यादीत अंतर्भूत होते. या प्रतिष्ठेच्या पदासाठी आवश्यक असलेला प्रशासकीय अनुभव, नाटय़प्रशिक्षणातील कौशल्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नाटय़कर्तृत्व या सर्वच बाबतींत प्रा. वामन केंद्रे हे अन्य दोन उमेदवारांपेक्षा कितीतरी सरस असल्याने त्यांचीच या पदावर वर्णी लागणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय ख्यातीच्या अनेक रंगकर्मीचे मत आहे. मात्र, या पदासाठी अर्जही न केलेल्या अरुंधती नाग यांच्यासाठी निवड समितीचे एक सदस्य गिरीश कर्नाड यांनी विशेष शिफारस केल्याचे समजते. कर्नाड हे नाग यांच्या ‘रंगशंकरा’ संस्थेशीही संबंधित असून, अलीकडेच त्यांचे ‘ब्रोकन इमेजेस’ हे नाटक अरुंधती नाग यांनी सादर केले होते. अरुंधती नाग अभिनेत्री म्हणून सुपरिचित असल्या तरी त्यांना नाटय़अध्यापनाचा अनुभव नाही. त्याचबरोबर एनएसडीसारखी नाटय़प्रशिक्षण संस्था चालविण्यासाठी लागणारे द्रष्टेपण त्यांच्यापाशी आहे का, याबद्दलही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. या पदासाठीचे तिसरे उमेदवार अब्दुल लतीफ खराना हे जरी एनएसडीमध्ये प्राध्यापक असले तरी त्यांचे नाटय़कर्तृत्व सीमित आहे. त्यामुळे ते संचालकपदाचे प्रबळ दावेदार मानले जात नाहीत.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर प्रा. वामन केंद्रे हेच योग्यता आणि सक्षमतेच्या बाबतीत अन्य दोन उमेदवारांपेक्षा भारी आहेत. मात्र, दिल्लीत मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मीची पुरस्कार आणि मानमान्यता यासंदर्भात नेहमीच जी उपेक्षा होते, त्याचा फटका प्रा. केंद्रे यांनाही बसणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.