राज्यातील पहिली शासकीय पर्यावरणस्नेही इमारत  
कोणत्याही खांबाचा आधार न घेता बांधण्यात आलेले ४३ चौरस मीटर लांबीचे छप्पर, त्यातील ३७ मीटर व्यासाचा डोम, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी दुपदरी काचेच्या तावदानांचा वापर, पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक यंत्रणा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थापासून तयार करण्यात आलेला बायोगॅस, मलनि:सारण प्रक्रिया केंद्राद्वारे सांडपाण्याचा उद्यानात केलेला पुनर्वापर, पाणी कपातीसाठी नळांना बसविण्यात आलेले सेन्सर, उद्यानातील ठिंबक सिंचन या सर्व पर्यावरणविषयक मानांकनांचा वापर करून बांधण्यात आलेल्या नवी मुंबई पालिकेच्या नवीन वास्तूचा मंगळवारी लोकार्पण सोहळा होत आहे. राज्यातील ही पाहिली शासकीय ग्रीन बिल्डिंग मानली जात आहे.
नवी मुंबई पालिकेचा कारभार गेली २३ वर्षे बेलापूर येथील सिडकोने बांधलेल्या एका सर्वसाधारण इमारतीतून चालत होता. मंगळवारपासून हा कारभार पालिकेच्या मालकीच्या आणि संकल्पनेतून बांधलेल्या स्वतंत्र इमारतीमधून चालणार आहे. बेलापूर सेक्टर १५अ येथे सिडकोकडून सहा वर्षांपूर्वी नाममात्र दरात घेण्यात आलेल्या अडीच हेक्टर जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली आहे. त्यातील ३३ हजार चौरस मीटर जागेत या पाच मजली इमारतींचे बांधकाम करण्यात आले असून, अद्ययावत आणि आधुनिक सुविधांनी युक्त ही इमारत मंगळवारी नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेल्या या इमारतीतील मुख्य सभागृहाचा वरील भाग कोणत्याही प्रकारचा आधार न घेता उभारण्यात आला आहे. त्यात ३७ चौरस मीटरचा डोम हा जणू काही तरंगता असल्याचा भास होतो. जीआरसी पद्धतीने बांधण्यात आलेला हा डोम इमारतीचे एक प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळेच या इमारतीच्या बांधकामाला थोडा उशीर झाला. ब्रिटिश काळातील काही इमारतींत अशाप्रकारचे डोम उभारले गेले आहेत. त्यानंतर बोटावर मोजण्याइतक्या इमारतींमध्ये असे डोम आहेत. या इमारतीत आधुनिकीकरण आणताना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घालून दिलेले निकष आणि नियम पाळण्यात आले आहेत. त्यामुळे ही इमारत ग्रीन बिल्डिंगमध्ये मोडत आहे. त्यासाठी इमारतीसाठी वापरण्यात आलेली काचेची तावदाने आतून व बाहेरून अशा दोन प्रकारात लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे सूर्याचा प्रकाश हा थेट आत प्रवेश न करता तो बाहेरील तावदानावरून परावर्तित होणार आहे. त्यामुळे आतील थंडावा कायम राहणार असून प्रखरपणा जाणवणार नाही. त्याचप्रमाणे स्वयंपाकगृहातील अन्नधान्याच्या टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून बायोगॅस प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. संपूर्ण इमारतीतील मल-जलावर प्रक्रिया करून तेच पाणी उद्यान आणि शौचालयांसाठी वापरण्यात येणार आहे. पावसाळी पाण्याचा साठा करण्यासाठी छतावर वेगळी यंत्रणा राबविण्यात आली आहे. पाण्याचा गैरवापर होऊ नये यासाठी सेन्सर लावण्यात आले असल्याने आवश्यक तेवढचे पाणी वापरता येण्यासारखे आहे. याशिवाय महिलांसाठी पाळणाघर आणि विश्रांतीकक्ष ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण इमारत सीसी टीव्हीच्या देखरेखीखाली राहणार असून, १५० कॅमेरे लावण्यात आले आहेत. इमारतीसमोर केंद्रीय गृह मंत्रालयाची विशेष परवानगी घेऊन उभारण्यात आलेला २२५ चौरस फुटांचा राष्ट्रध्वज हा देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज ठरणार असल्याने त्याचा जागतिक विक्रम होणार आहे. त्यामुळे हा ध्वज २४ तास फडफडत राहणार असून तो नवी मुंबईची शान ठरणार आहे. नवी मुंबईच्या सौंदर्यात हा एक मानाचा तुरा समजला जात आहे. या संपूर्ण इमारतीवर १७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, पाच वर्षांत हे काम पूर्ण झाले आहे. अशा या सुंदर आणि आखीव रेखीव इमारतीचे मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal office starts from today
First published on: 18-02-2014 at 08:34 IST