वर्षअखेरीची वेळ काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या महिन्यात नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवायांचा धमाका लागला आहे. गेल्या वर्षांच्या कारवायांची री ओढून दाखविण्याच्या उच्चपदस्थांच्या चढाओढीच्या स्पर्धेत नवी मुंबईचे अडीचशे वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्यांवर नियमांचा बडगा दाखवत दंड आकारण्यासाठी हातात पावतीबुक घेऊन सज्ज झाले आहेत.
हिवाळ्यात टार्गेट गाठण्याची आदेशवजा शिक्षा सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या हाताखाली तैनात रस्त्यांवरील शिपायांना दिली आहे. या आकडेवारीच्या चढाओढीत नवी मुंबईतील सामान्य वाहनचालक भरडला जात आहे. काहीही करा, पण पावती फाडा आणि पुढचा रस्ता धरा..अशी तंबीच त्यामुळे वाहनचालकांना पोलिसांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. वाहनचालकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता जा वरिष्ठांकडे काय करायचे ते करून घ्या, अशी शाब्दिक चकमक रस्त्यांवर होताना पाहायला मिळते.  
नवी मुंबईतील वाहतूक नियमनासाठी ४०४ कर्मचारी व २५ पोलीस अधिकारी तैनात आहेत. यापैकी प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी २५० कर्मचारी तैनात आहेत. पोलीस ठाणे अंमलदार, साप्ताहिक सुट्टी, हक्क रजा व आजारपणाच्या रजा भोगत असल्याने नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्यातील हजारो वाहनांचे नियमन सिग्नल यंत्रणा व अडीचशे पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. साडेतीन वर्षांपूर्वी नवी मुंबईवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागाचा स्वतंत्र कारभार सुरू केला. या कारभारावर देखरेखीसाठी पोलीस उपायुक्त पदाची तरतूद करण्यात आली. तत्कालीन पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी नवी मुंबईतील दळणवळण लक्षात घेता नवनवीन प्रयोग करत वाहतूक विभागाची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या वर्षी जेवढय़ा कारवायांची आकडेवारी झाली त्यापेक्षा अधिक किंवा त्याची बरोबरी करण्याची स्पर्धा अलीकडे सर्वच सरकारी कार्यालयांतील उच्चपदस्थांना लागल्याने नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांना डिसेंबर महिन्यात कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मिळेल त्या वाहनांवर सुरू असलेली बेधडक कारवाई हे त्याचेच एक उदाहरण आहे. उच्च पदस्थांच्या आकडेवारी गाठण्याच्या लढाईत सामान्य पोलिसांसोबत वाहनचालक त्रासले आहेत. नवी मुंबईच्या वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅनमुळे याआधीच अवजड वाहनचालक त्रासले असताना सकाळपासून महामार्ग किंवा वसाहतींच्या अंतर्गत रस्त्यांवर सुरू असणारी दुचाकींची कागदपत्रे तपासण्याची मोहीम ही अन्यायकारक असल्याचे वाहनचालक बोलत आहेत. वर्षभराचा आकडा गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकाच महिन्यात आदेश देण्याऐवजी प्रत्येक महिन्याला टार्गेट देऊन त्या कारवायांच्या आकडेवारीची पूर्तता करावी असे मत एका पोलीस शिपायाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने काय करणार, वरूनच आदेश आहेत, मात्र आम्हाला उच्चपदस्थांच्या नजरेत आणू नका असे सांगून आपला मोबाइल बंद केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai traffic police
First published on: 09-12-2014 at 06:50 IST