‘आई राजा उदे उदे’ चा गजर, लेझीम, झांज, टिपऱ्यांचा सुरेख खेळ, अबिर – गुलालाची मुक्त उधळण, डौलाने फडकणारे भगवे ध्वज अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात वाजत गाजत मिरवणुका काढून सोलापूर शहर व परिसरात विविध सार्वजनिक शक्तिदेवी उत्सव मंडळांनी शक्तिदेवी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी होऊन रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. या भर पावसात शक्तिदेवी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरूच होत्या.
शहर व परिसरात ४२३ सार्वजनिक मंडळांनी शक्तिदेवीची प्रतिष्ठापना केली. मानाच्या श्री रूपाभवानी मंदिरात दुपारी घटस्थापनेने नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला. तसेच भावसार समाजाची कुलदेवता श्री िहगुलांबिका माता, उत्तर कसब्यातील श्री कालिकादेवी माता, लाड तेली समाजाची श्री जगदंबा माता, गोंधळी समाजाची श्री इंद्रभवानी माता आदी विविध शक्तिदेवींच्या मूर्तीची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेचे विधी दुपारी उशिरापर्यंत चालू होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आले.
सकाळपासून सार्वजनिक शक्तिदेवी मंडळाच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरू होत्या. पांजरापोळ चौक, बाळी वेस, नवी पेठ, माणिक चौक, पूर्व भाग आदी ठिकाणी मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. बाळीवेस शक्तिदेवी मंडळाची मिरवणूक जल्लोषात निघाली. भव्य लेझीम पथक , बलजोडया लक्षवेधी ठरल्या. भया चौकातील गणपती हॉल मंडळाच्या लेझीम पथकाने एकापेक्षा एक सरस डाव सादर करून नागरिकांचे चित्त वेधून घेतले. लोणारी गल्लीतील शिवशक्ति मंडळाच्या लेझीम पथकाने सुंदर कलाविष्कार सादर केला. पांजरापोळ चौकातील शिवस्मारक मंडळ, नव्यापेठेतील शक्तिपूजा मंडळ, जयिहद चौक नवरात्रौत्सव मंडळाच्या मिरवणुका उत्साही वातावरणात पार पडल्या. बाजीराव चौकातील शिवस्मारक मंडळाच्या मिरवणुकीत बाल वारकऱ्यांची मोठी िदडी होती. रामवाडी भागातील इच्छा भगवंताची शक्तिदेवी मंडळाच्या मिरवणुकीतही लेझीम ताफ्याद्वारे शक्तिप्रदर्शन घडले.
गणेशोत्सवाच्या तुलनेने नवरात्रौत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्याची सोलापूरची परंपरा आहे. त्यामुळे रस्त्यावर भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला. विविध संवेदनशील भागात ७० तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलिसांची तुकडी, गृहरक्षक दलाच्या स्त्री – पुरूष जवानांचा वापर बंदोबस्तासाठी केला जात आहे. याशिवाय पोलिसांची फिरती गस्त पथके, बॉम्ब शोधक पथकाचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri festival start in solapur
First published on: 06-10-2013 at 01:55 IST