नक्षलवाद्यांनी दीर्घकालीन युद्धाची आखणी केली आहे, याउलट शासनाचे धोरण मात्र दूरदृष्टीचे नाही. नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसेला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांकडून परिसरातील गावकऱ्यांना मारहाण होते. परिणामी लोक पोलिसांना मदत करण्याऐवजी नक्षलवादाकडे आकर्षित होतात, असे मत ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ वार्ताहर देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले.ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र व जनतंत्र उद्बोधन केंद्राच्या वतीने ‘नक्षलग्रस्त प्रदेशांसाठी विकासाचे मार्ग’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. दंतेवाडा जिल्ह्य़ाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरजकुमार बन्सोड हेही त्यात सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ होते.नक्षलवाद्यांनी दीर्घकालीन युद्धाची आखणी केली आहे. शासनाचे धोरण दूरदृष्टीचे नाही. नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसेला प्रत्युत्तर म्हणून गावातील लोकांना पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे ते दुखावले जातात. बहुसंख्य आदिवासी नक्षलवाद्यांसोबत नाहीत, पण अशा गोष्टींमुळे ते दुरावतात. शासनाची बरीच धोरणे कुचकामी आहेत. पोलिसांसाठी ‘पोलीस मॅन्युअल’ निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा होईल. प्रशासनातील अधिकारी गडचिरोलीला जायला तयार नाहीत. शासन यंत्रणेने प्रामाणिकपणे काम केल्यास परिस्थितीमध्ये सुधार शक्य आहे, असेही गावंडे म्हणाले.अधिकाऱ्यांनी आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दंतेवाडामध्ये काम करण्याची फार गरज आहे. अत्यंत मागास असलेल्या आदिवासी समूहांसोबत काम करून त्यांची मने जिंकावी लागतील. पोलिस उपमहानिरीक्षक कल्लूरी यांच्यासारख्या कार्यकुशल अधिकाऱ्यांमुळे नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळाली. विविध शैक्षणिक उपक्रमांसोबत १५० एकरातील एज्युकेशन सिटीसारख्या उपक्रमांमुळे नक्षलप्रभावित भागातील विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बचपन बचाओ योजनेअंतर्गत या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध झाल्या. नक्षलवादी पोलिसांना विरोध करतात, प्रशासनास विरोध करीत नाहीत, असे बन्सोड म्हणाले. प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीषा शेंडे यांनी केले.