उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी स्वत:च विद्यापीठाचे नामांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे नाराज झालेल्या पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी हा फलक काढून घेतला असला तरी या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला, याची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी तथा महानगरचे माजी अध्यक्ष विनोद देशमुख यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फलकावर दोन्ही बाजूंनी ‘खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ’ असा फलक उभारला. विद्यापीठाच्या फलकावर असा फलक लावल्याची माहिती मिळताच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांच्यात आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक महाजन यांनी विद्यापीठाच्या फलकावर अशा प्रकारे विनापरवानगी फलक लावणे अयोग्य असल्याचे सांगितले. परंतु पदाधिकारी व कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शासनाने विद्यापीठाकडे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यासंदर्भात अभिप्राय मागितला आहे, तो तुम्ही देण्यास विलंब का करता, असा आंदोलकर्त्यांचा सवाल होता. त्यावर कुलसचिव व विद्यापीठाचे अधिकारी स्पष्टीकरण देत होते. तरीही वाद सुरूच राहिला.
अखेर पालकमंत्री देवकर यांच्यापर्यंत हा विषय गेला. त्यांनी स्वत: कार्यकर्त्यांची समजूत घातली. बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आपण लवकरच मंजुरी मिळवून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर नामांतराचा फलक काढण्यात आला.
मागील महिन्यात अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर भजन व कीर्तन करीत त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे ते पदाधिकारी स्वपक्षाच्या नेत्यांच्या टीकेचे लक्ष बनले होते.