मराठा समाजाच्या नावाने राज्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस मराठय़ांच्याच न्याय्य मागण्यांकडे लक्ष देत नाही, असा आरोप अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी केला.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, गणेश गोमसाळे, राजाभाऊ गुंजरगे, सिदाजी आकाश पाटील उपस्थित होते.
जावळे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोठय़ा संख्येने नेते असताना या नेत्यांकडूनच आरक्षणासंदर्भात विरोध सुरू आहे.
मराठय़ांच्या नावाने राज्य करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठय़ांच्याच न्याय मागण्याकडे हेतु:पुरस्सर लक्ष देत नाही.
मुख्यमंत्र्यांबरोबर छावा पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असता त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला व मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे यांची समिती नेमली. ही समिती गावागावत फिरून मराठा समाजाची नोंदणी करणार आहे. मराठवाडय़ात नांदेड येथे २ मार्चला मराठा आरक्षणासंदर्भात मेळावा, तर शिर्डी येथे ३ फेब्रुवारीला मेळावा होईल. दि. १२ जानेवारीला तुळजापूर येथे छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आम्हीच करणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.
लातूर शहरात सध्या व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. व्यापारी ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.