राज्य शासनाने महानगर पालिकांवर लादलेल्या एलबीटी करप्रणालीच्या विरोधात गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेल्या व्यापाऱ्यांचे आंदोलनाचा नागरिकांना फटका बसत आहे. उन्हाचा तडाखा  राज्य शासन आणि व्यापारांचा वादामध्ये नागरिकांना वेठीस धरले जात असताना जीवनाश्वक वस्तूंची दुपट्ट भावाने चिल्लर विक्रेत्यांकडून विक्री केली जात आहे. व्यापारांनी घोषित केल्याप्रमाणे काही व्यापारी बेमुदत उपोषण सुरू केले असून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि रस्ता रोको करून सरकारला निषेध केला.
मुख्यमंत्र्याशी चर्चा करून आल्यानंतर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी समितीने आंदोलन तीव्र केले असून जो पर्यत एलबीटी रद्द होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देत बाराव्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवून सरकारचा निषेध केला. व्यापारांनी एलबीटीच्या विरोधात उपोषणाची घोषणा केल्यानंतर कपडा व्यवसायी
दिनेश सारडा यांच्या नेतृत्वात गोपाल भाटिया, मोतीलाल चोथियानी, कमल कपूरिया, रघु पूनियानी, हरिओम झाम, राजू छाबरिया यांनी बेमुंदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध व्यापारी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. चेंबरचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांच्यासहीत भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, विश्व हिंदू परिषदेचे विदभर्आचे अध्यक्ष हेमंत जांभेकर, बजरंद दलाचे श्रीकांत आगलावे, अमंोल ठाकरे, चेंबरचे माजी अध्यक्ष प्रफुल दोषी, रमेश मंत्री आदींनी भेट दिली. शहरातील मुख्य बाजारपेठशिवाय महाल, केळीबाग, सक्करदरा, पाचपावली, गांधीगेट, कॉटेन माीर्केट या भागातील दुकाने बंद होती. शहरातील काही भागातील व्यापारांची प्रतिष्ठाने सुरू असल्यामुळे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी अशा व्यापारांवर कारवाई करून त्यांना नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला.
गांधीबाग परिसरात व्यापारांनी टायर आणि ऊसाच्या पेंडय़ा जाळून काही वेळ रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण झाले होते मात्र पोलिसांनी घटनासथळी धाव घेऊन उत्साही व्यापारांना पिटाळून लावले. गुरुवारी रात्री धंतोली परिसरात एलबीटीच्या विरोधात पोलिसांची परवानगी न घेता कँडल मार्च काढल्यामुळे काही व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याचा व्यापारी संघटनांनी निषेध केला. व्यापारांचे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार असून यापुढे जर व्यापारांवर पोलिसांनी कारवाई केली तर रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा चेंबरचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिला.
दरम्यान गेल्या बारा दिवसापासून बाजारपेठ बंद असल्यामुळे ग्राहकांना जास्त किंमतीमध्ये वस्तू विकत घ्याव्या लागत आहे. दिवसभर बाजारपेठा बंद असल्याची खंत व्यक्ती करीत सायंकाळी दुकाने उघडून ग्राहकांकडून चढय़ा दराने जीवनावश्यक विक्री सर्रासपणे सुरू आहे.
वर्धमाननगरातील बिग बाजार बंद असून सीताबर्डीमधील बीग बाजार मात्र सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. ठोक बाजारातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे चिल्लर विक्रेत्यांना माल मिळणे बंद झाले आहे. त्यातही आयात बंद करण्यात आल्यामुळे  साखर, तेल, डाळ, गहु, तांदळासहीत इतरही जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतो आहे.