गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील तिसावा लेख..
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समितीमार्फत तंटा सोडविण्यापासून ते प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यापर्यंत प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत समितीला काही अडचणी उद्भवू शकतात. त्याचे निराकरण करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ समितीला लाभणे आवश्यक असते.
गावातील शांतता धोक्यात येणार नाही, या उद्देशाने गावात तंटे निर्माण होऊ नयेत आणि अस्तित्वात असणारे तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आवश्यक तिथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे, असे या मोहिमेचे तीन भाग आहेत. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी आणि त्या माध्यमातून गावे तंटामुक्त व्हावीत, या भूमिकेतून गावांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. या प्रक्रियेत तंटामुक्त गाव समितीला सक्रियपणे कार्यरत रहावे लागते. ग्रामस्थांमध्ये जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे, भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न करणे, अनिष्ट प्रथा व चाली-रीती नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेने आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. याकरिता शासनाने शासकीय अधिकाऱ्यांवर काही जबाबदारी सोपविली आहे. जिल्ह्यातील पोलीस व महसूल अधिकारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आपापल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात दौऱ्याच्यावेळी गावांना भेटी देऊन गावातील मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेणे. ग्रामपंचायतीला व तंटामुक्त गाव समितीला या मोहिमेसंबंधी येणाऱ्या अडचणी जाणून घेणे. त्यांच्या अडचणींचे निराकरण करून आणि मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. तालुक्यातील तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुख हे त्यांच्या कार्यक्षेत्रामधील दौऱ्याच्यावेळी मोहिमेत सहभागी गावांना भेटी देवून तंटामुक्त गाव समितीला मार्गदर्शन करतील. त्यांच्या अडचणी सोडविण्यात व तंटे सोडविण्यामध्ये सहकार्य करतील. तसेच तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुख हे संयुक्तपणे दौरे करून मोहिमेत सहभागी गावांना भेटी देऊन मार्गदर्शन करतील, असे शासनाने सूचित केले आहे. या मोहिमेच्या अमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय व गृह विभागात तंटामुक्त गाव मोहीम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.