उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तश्रंग गडावर जाण्यासाठी असणाऱ्या १० किलोमीटरच्या घाटमार्गावरील वळणांवर ठिकठिकाणी कठडे ढासळलेले असून काही वर्षांपूर्वी अतिशय गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन देखील त्याची डागडुजी करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे.
कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर वर्षभर भाविकांसह पर्यटक लाखोच्या संख्येने येत असतात. विशेष: नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची संख्या मोठी असते.
गडावर जाण्यासाठी नांदुरी गावापासून १० किलोमीटरचा वळणघाट चढून जावे लागते. घाटमार्गावरील वळणावर ठिकठिकाणी कठडे ढासळल्याने तो धोकादायक बनल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
तीन वर्षांपूर्वी नांदुरीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका वळणावर खासगी आराम बसला अपघात होऊन ४० प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. याच वळणावरील कठडे जीर्ण झाले असून ठिकठिकाणी त्यांची पडझड झाल्याचे दिसते.
कठडय़ांची पाहणी केली असता केवळ दगड रचून वरून सिमेंटचे आच्छादन केल्याचे निदर्शनास येते. अशा कठडय़ांमुळे अपघात घडल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे.
यामुळे अशा अवघड घाटात कठडे सिमेंट काँक्रीटीकरणाद्वारे मजबूत राखणे गरजेचे आहे.
 परंतु, त्याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जात आहे.
या शिवाय, पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. त्यासाठी प्रतिबंधक काम हाती घेणे आवश्यक आहे. सप्तशृंग गडाच्या पर्यटन विकासासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती मध्यंतरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. त्या अंतर्गत रोपवे, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेली ठराविक
कामे प्रगतीपथावर असली तरी ती पूर्णत्वास गेलेली नाही व इतर कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. एकूणच सप्तशृंग गडावरील विकास कामे संथगतीने सुरू आहे.
 घाटातील कथडय़ांचा मजबुतीकरणासोबत विकास कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण करावी, अशी मागणी पर्यटक व भाविकांनी केली आहेत.