चिंचवडगावातील जैन मंदिरातील चोरीप्रकरणात नेपाळी तरुणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्याकडून मंदिराच्या दानपेटीतून चोरलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तपास पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.
मुकेश लालबहादूर साही (वय-२३, जुना जकातनाका, चिंचवडगाव), गणेश चंदन शहा (वय – २२, गव्हाणे वस्ती, भोसरी), राजेश पदम खत्री (वय-३०), रमेश रूपानंद जोशी (वय-४०, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. कामाच्या शोधात ते या ठिकाणी आले होते,
चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त विष्णू माने व सुधीर चौगुले उपस्थित होते. चिंचवडगावातील जैन मंदिरात १८ जानेवारीच्या मध्यरात्री चोरटय़ांनी छतावरून प्रवेश केला. दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व मूर्तीच्या मुकुटाचा खडेजडीत कानासारखा भाग चोरून नेला. पोलिसांनी श्वान पथक व लॅब मोबाईलच्या सहाय्याने तपास केला.