मध्य रेल्वेच्या प्रवाशांची तिकिटासाठीची वणवण थांबवण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट ही संकल्पना सुरू करण्याचे ठरवले असले, तरी त्या जोडीला एटीव्हीएम यंत्रांचा प्रसारही जोरात सुरू आहे. मध्य रेल्वेवर याआधी ३२० एटीव्हीएम यंत्रे अस्तित्वात होती आणि आता नव्या घोषणेनुसार आणखी २८८ नवीन यंत्रे येणार आहेत. त्यापैकी ११२ यंत्रे यापूर्वीच रेल्वेच्या विविध स्थानकांवर बसवण्यात आली आहेत. यापैकी सात यंत्रे सोमवारी भायखळा आणि सँडहर्स्ट रोड या दोन स्थानकांवर बसवण्यात आली.

तिकीट रांगांमध्ये उभे राहण्यापासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने सीव्हीएम कूपन्सपासून ते जेटीबीएस केंद्रांपर्यंत अनेक पर्याय चाचपडले आहेत. मध्य रेल्वेवर जेटीबीएस आणि एटीव्हीएम या दोन पर्यायांवरून होणाऱ्या तिकीट विक्रीची संख्या जास्त आहे. मध्य रेल्वेस्थानकांवर याआधी असलेल्या ३८० एटीव्हीएम यंत्रांपैकी ६० यंत्रे नादुरुस्त होती. मध्य रेल्वेने ही यंत्रे बदलली. त्या जागी २८८ नवीन यंत्रे बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले होते.
या २८८ पैकी ११२ यंत्रे मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर बसवण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५ यंत्रे ठाणे स्थानकाच्या वाटय़ाला आली आहेत; तर सोमवारी भायखळा येथे चार आणि सँडहर्स्ट रोड येथे तीन अशी सात यंत्रे बसवण्यात आली आहेत. यापुढील १७६ एटीव्हीएम लवकरच मध्य रेल्वेच्या स्थानकांवर येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.