नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर येथे प्रवरा नदीच्या मोडकळीस आलेल्या पुलाला पर्यायी पूल बांधण्यासाठी केंद्रीय बांधकाम खात्याने १० कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
ब्रिटीश काळात प्रवरा नदीवर उभारण्यात आलेला हा पूल कालबाह्य़ झाल्याने रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या या पुलास राष्ट्रीय महामार्ग असूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. या पुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीचे दोन भाग करुन, जड वाहतुकीसाठी ठरावीक वेळ देण्यात आली आहे. तरीही या मार्गावरील वाहतूक बेभरवशाची झाली असून, दिवसभरात अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नवीन पूल बांधणीची गरज लक्षात घेऊन खासदार वाकचौरे यांनी केंद्र सरकारच्या दळणवळण खात्याचे राज्यमंत्री सत्यनारायण यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.
या पुलाची बीओटी तत्वावर उभारणी होऊ नये व तेथे टोल वसुली होऊ नये यासाठी वाकचौरे आग्रही होते. या पुलासाठी चालू वर्षी ४ कोटी ११ लाख रूपये व पुढील वर्षी ६ कोटी ४६ लाख रुपये दिले जाणार आहेत. लवकरच या पुलाच्या बांधकामासाठी ई-निविदा काढण्यात येणार आहे. शिर्डी शहरातून जाणारा नगर-मनमाड हा राज्य महामार्ग उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा, तसेच अत्यंत वर्दळीचा असल्याने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.