महापुरे झाडे जाती
तेथे लव्हाळे वाचती..
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओवी केवळ दाखले देण्यासाठी नसून खरोखरच महापुरात मोठमोठी वृक्ष उन्मळून पडतात, त्या ठिकाणी लव्हाळे जातीतील वनस्पती मूळे घट्ट रोवून असतात. ‘नागरमोथा’ नाव ऐकल्याबरोबर शिकेकाई, रिठ्ठयांचे मिश्रणाची आठवण होते. नागरमोथा सुगंधासाठी प्रसिद्ध असल्याने त्याचा समावेश मिश्रणात करण्यात येतो. नागरमोथा ही वनस्पतीदेखील लव्हाळे जातीतीलच आहे. विदर्भात लव्हाळे जातीतील नवी वनस्पती आढळली असून तिचे  नामकरण ‘नायकिया कर्णी’ असे करण्यात आले आहे.
 या जातीच्या वनस्पतींचा दैनंदिन जीवनाशी कमी संबंध असला तरी वनस्पतीशास्त्रात फार महत्त्वाचे दालन लव्हाळे वनस्पतींचे आहे. या दालनात गोंदिया जिल्ह्य़ातील आणखी एका वनस्पतीची भर पडली असून तिचे नामकरण ‘नायकिया कर्णी’ असे करण्यात आले आहे. यासंबंधीचे संशोधन सध्या भारतातील आघाडीचे वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लव्हाळे जातीवर संशोधन करणारे डॉ. एम. ए. वधूतखान, आमगावच्या भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे आणि कहालकर यांनी केले आहे.
‘नायकिया कर्णी’ हे नाव ठरवण्यामागेही महत्त्वाचे कारण आहे. वनस्पती शास्त्रज्ञांची नावे लॅटिनमध्ये लिहिलेली आहेत. भारतात वनस्पतीशास्त्रातील नागार्जून समजल्या जाणाऱ्या व्ही. एन. नाईक आणि इंग्लंडमधील तज्ज्ञ कर्णी यांच्या नावावरून या लव्हाळे वनस्पतीचे नाव ‘नायकिया कर्णी’ असे ठेवण्यात आले.
गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगाव बांधजवळच्या राजोली येथील दलदलीच्या ठिकाणी ही वनस्पती सापडली. या वनस्पतीचे वर्गीकरण कोठेच होत नव्हते. दोन वर्षांच्या सखोल अभ्यासांती तिचा समावेश ‘सायपरसी’ म्हणजे लव्हाळे जातीत करण्यात आला. नुकतेच ‘नायकिया कर्णी’चे वर्गीकरण ‘वर्ल्ड फ्लोरा’मध्ये करण्यात आल्याचे डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी सांगितले.
नागपूरच्या डाटसन प्रकाशनाने भारतातील सर्व प्रकारच्या लव्हाळे जातीतील वनस्पतींचा समावेश असलेले डॉ. वधूतखान यांचे ‘दी सायप्रसी ऑफ इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित केले असून ३,६०० रुपयांचे हे पुस्तक मिळेनासे झाले आहे. या क्षेत्रात अभ्यास करणारी मोजकीच माणसे असून त्यांचे काम हिमालयाच्या तोडीचे आहे. एखादी कविता स्फुरावी एवढे विज्ञानातील संशोधन सोपे नाही. वेगवेगळ्या मुशीतून गेल्यानंतरच संशोधन प्रस्थापित होऊन नंतरच्या पिढय़ांना त्याचा उपयोग होत असतो. सुगंधीत उटणे, दागदागिन्यांसाठी या लव्हाळे जातीच्या वनस्पतीचा उपयोग होतो. शिवाय यांच्यापासून चटयाही तयार केल्या जातात. या वनस्पती पाण्यातील असल्याने त्यांच्यापासून केलेल्या चटया सडत नाहीत. ‘नायकिया कर्णी’चे विश्लेषण (फायटो केमिस्ट्री) अद्याप व्हायचे आहे. त्यानंतरच तिचे फायदेतोटे
आणि इतरही बाबी उलगडू शकतील. तूर्त विदर्भात सापडलेल्या या नवीन वनस्पतीचा आम्हाला अभिमान वाटतो, असे डॉ. भुस्कुटे म्हणाले.
ज्योती तिरपुडे, नागपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New cast of sedge plant in vidharbha
First published on: 06-02-2015 at 02:44 IST