प्लॅनिंग सिटी, सायबर सिटी, एज्युकेशनल हब, आयटी कॅपिटल आणि फ्युचर सिटी अशा विविध प्रकारच्या नाम बिरुदावलीने नवी मुंबईची आतापर्यंत ओळख सांगितली जात असली, तरी अलीकडे नवी मुंबईतील एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असणाऱ्या विष्णुदास भावे नाटय़गृहात होणारे तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रमात होणारे ‘अश्लील विनोद’, ‘एक चावट संध्याकाळ’, ‘त्या चार योनीच्या गुजगोष्टी’ यांसारख्या नाटय़प्रयोगांना लोटणारी गर्दी पाहता एक चावट नवी मुंबई, अशी एक नवी ओळख नवी मुंबईची होण्याची शक्यता दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नुकताच महोत्सव महासंस्कृतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ६ व ७ जानेवारी रोजी भावे नाटय़गृहात दोन सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी तमाशासम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर यांच्या नावे देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार या वर्षी श्रीमती प्रभा शिवणेकर यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम झाल्यानंतर नारायणगांवकर यांचा लोकनाटय़ तमाशा मंडळाचा तमाशा फड रंगला. या कार्यक्रमात अनेक अश्लील विनोद केले गेले. काही रसिकांनी हे विनोद एन्जॉय केले तर काही जणांनी नापसंती व्यक्त केली.
नवी मुंबईत असणारा मोठय़ा वर्गातील सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्य़ातील कष्टकरी कामगारांमुळे वाशी येथील भावे नाटय़गृहातील तमाशा प्रयोगांना चांगलीच पसंती दिली जाते, असे दिसून आले आहे. कष्ट करून थकलेला माथाडी, व्यापारी मनाला विरंगुळा म्हणून या तमाशांना आर्वजून हजेरी लावतो आणि गावाकडच्या जुन्या आठवणींना उजाळा देतो. ऐरोली येथील एक दिवंगत नगरसेवक, पहिल्या टर्ममधील वाशीतील एक ज्येष्ठ नगरसेवक यांच्या तर पहिल्या रांगेतील खुच्र्या अनेक वर्षे राखीव होत्या.
 शिटय़ा, टाळ्या, टोप्या, फेटे यांचा नजारा या कार्यक्रमांना केवळ वाशीतच पाहण्यास मिळतो. तमाशांच्या या शृंखलेत अलीकडे एक चावट संध्याकाळ, त्या चार योनीच्या गुजगोष्टी, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी, पांढरपेशा वेश्या अशा नाटय़प्रयोगांना चांगलीच गर्दी होत असल्याचे भावे नाटय़गृहातील एका नाटय़प्रयोग व्यवस्थापकाने सांगितले.
सध्या रंगभूमीवर फॉर्मात असणारे ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकाचे तर मागील वर्षी १४ प्रयोग झाले आहेत. या प्रयोगांना वेळप्रसंगी कधी न उघडली जाणारी बाल्कनीही उघडावी लागत आहे. या नाटय़प्रयोगांना महिलावर्गदेखील उपस्थित राहत असतो हे विशेष. ठाणे रायगड जिल्ह्य़ातील तरुण ग्रामस्थ, एपीएमसीतील व्यापारी, माथाडी, मापाडी, मराठी तरुणाई हा या नाटकांचा चाहता वर्ग असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New name to new mumbai mischievous new mumbai
First published on: 21-01-2014 at 07:18 IST