पहिल्या सत्रात अपवाद वगळता सलग कोसळलेल्या पावसाने रात्रीचा जोर तर दिवसाची ओढ अशी तऱ्हा दाखवत अनेक विक्रम प्रस्थापित केले. कोयना जलाशयात गतवर्षी आजमितीला ३५ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. यंदा मात्र याच्या दीडपट म्हणजेच सुमारे ५२ टीएमसी पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. गतवर्षी दोनतृतीयांश भरलेले कोयना धरण गेल्या १७ दिवसांपासून शिगोशिग भरून वाहात आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना जलाशयात केवळ ५७ दिवसांत प्रतिदिनी २ टीएमसीच्या सरासरीने ११४ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात साडेतीनपटहून जादा पाण्याची आवक झाली असून, पहिल्या सत्रातील एकंदर भरघोस पाऊस धरणाच्या इतिहासातील बहुधा सर्वाधिक असल्याचे धरण व्यवस्थापनाने नमूद केले आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने हंगामाच्या सांगतेला म्हणजेच तब्बल सव्वाशे दिवसांनी कोयना धरण कसेबसे क्षमतेने भरले होते. यंदा मात्र, पहिल्या सत्रातील ४० दिवसांतच धरणातून पाणी सोडणे अपरिहार्य बनले.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठावरील संततधारेमुळे कोयना धरणाचे दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता ४ फुटांवरून ६ फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात पायथा वीजगृहासह ३८,३४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, सुमारे ७० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणीपातळी वाढतीच आहे. परिणामी, उर्वरित पावसाळा व धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचाराधीन घेऊन संभाव्य पूर व महापुराचे संकट टाळण्यासाठी धरणातून आत्ताच पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी विनंती धरण व्यवस्थापनाला करण्यात आल्याची माहिती पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी देताना आमच्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा साडेबारा फुटांवर जाणार का याकडे आता नजरा लागून राहणार आहेत.
कोयना धरणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्प शिगोशिग भरून वाहात असून, या पाण्याचा विसर्ग सुमारे १ लाख ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून, पाणीसाठा ९२ टक्क्यांवर असल्याची आकडेवारी आहे.  
कोयना जलसागरात सध्या ७० हजार क्युसेक पाण्याची बक्कळ आवक होत असताना, धरणातून तुलनेत ५५ टक्केच म्हणजेच ३८,३४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. परिणामी धरणाचा पाणीपातळी प्रत्येक तासाला काही इंचांनी वाढत आहे. दिवसभरात धरणाची पाणीपातळी १ फुटाने वाढून २,१५४ फूट ८ इंच असून, पाणीसाठा ९३.८७ टीएमसी म्हणजेच ८९.२० टक्के आहे. दरम्यान, कोयना धरणामध्ये गेल्या ५७ दिवसांत धरणाच्या १०५.२५ टीएमसी क्षमतेपेक्षा जादा अशा ११४ टीएमसी म्हणजेच १०८.३२ टक्के पाण्याची आवक झाली आहे. पैकी धरणाच्या ६ वक्र दरवाजातून ४५ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तर पायथा वीजगृहासाठी ३.०५ तसेच पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सुमारे ४ टीएमसी पाणीसाठा वापरात येताना सुमारे ५२ टीएमसीचा धरणातून विसर्ग झाला आहे. पहिल्या सत्रातील विक्रमी पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट गडद होऊ पाहात असून, सध्या सततच्या पावसाचा खरिपाच्या पिकांवर दुष्परिणाम होणार असल्याची भीती कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा दुष्काळी पट्टय़ातही समाधानकारक पाऊस झाला आहे, मात्र हा पाऊस संपूर्ण दुष्काळ निवारण्यास निश्चितच अपुरा असल्याचे म्हणावे लागेल. सध्या कृष्णा, कोयना नद्या पूरसदृश स्थितीत वाहात असून, मात्र तूर्तास तरी पूर अथवा महापुराचा धोका संभवत नसल्याचे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.  
सायंकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या ३४ तासांत कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात २९२ एकूण ४,३३०, नवजा विभागात ३०८ एकूण ५,०४४, तर महाबळेश्वर विभागात २०७ एकूण ४,६९१ मि.मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,६८८.३३ मि.मी. असून तो आजवरच्या सरासरीत सुमारे ४५ टक्क्यांनी जादा आहे. गतवर्षी एकूणच संपूर्ण हंगामात परतीच्या पावसासह ४७७६.३३ मि.मी. पावसाची नोंद आहे.