वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून प्रभुत्व मिळवलेल्या क्षेत्राबाहेर जात नव्याने स्वतचा आणि जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मंगळवार, २५ ऑगस्टपासून जहांगीर कलादालनात सुरू होत आहे. कोबाल्ट आर्टकडून भरवण्यात येत असलेल्या या प्रदर्शनात उगवते कलाकारही त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून स्वतचे कौशल्य सादर करणार आहेत.या प्रदर्शनात एकाच वेळी अमूर्त आणि पारंपरिक रेखीव कलाकृती पाहता येतील. जोगन चौधरी, सुनील दास, जॉन फर्नाडिस, प्रकाश करमरकर, अतुल देढिया आणि परेश मैती या प्रख्यात कलाकारांनी स्वतच्या सराव क्षेत्राच्या बाहेर जात कलाकृती सादर केल्या आहेत. मोठय़ा, आखीवरेखीव आणि सुस्पष्ट कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अतुल देढिया यांचे हंटर हे लहान चित्रकृतींचे (मिनीएचर्स) सादरीकरण होत आहे. रेषेला अत्यंत महत्त्व असलेल्या व्यक्तिरेखेत पारंगत असलेल्या परेश मैती यांनी चारकोल स्केचमधून बोट हे चित्र निर्मिले आहे. अर्धपारदर्शकता आणि वेगळा विचार देणाऱ्या निसर्गचित्रांमधून स्वतची ओळख जपलेल्या जॉन फर्नाडिस यांनी स्त्रीरेखा चित्रांमधून मांडली आहे. या दिग्गजांसोबत मनोज साकळे, पराग बोस्रे, प्रदीप िशदे, गणेश तायडे, देवेंदु उकील, गिरीश उडकुडे, गुंजन कावलगी, वर्षां व्यास, मधुमिता भट्टाचार्य, नीति हेगडे, शुवेंदू सरकार, अभिजीत िशदे, दिलीप दुधाणे आणि अशोक भौमिक हे कलाकारही चित्र आणि शिल्पकृती सादर करत आहेत. हे प्रदर्शन ३१ ऑगस्टपर्यंत खुले राहील.