शहरातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारण्याच्या निर्णयास आज झालेल्या नगरपालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. विरोधी नगरसेविकांनी गदारोळ करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांच्या ‘बहुमता’पुढे हा आवाज नेहमीप्रमाणे दबला गेला.
नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष दिलीप नागरे व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या उपस्थिसतीत पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी ११ वाजता सर्व साधारण बैठकीस प्रारंभ झाला.
या वेळी अनेक विषयांवर खडाजंगी चर्चा झडल्या. नगरपालिकेने नगर विकास आराखडय़ातील आरक्षण नं. ३८ येथे भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्याचे निश्चित केले होते. उत्सव मंगल कार्यालय परिसरात असलेल्या चौधरी यांची ही आरक्षित जागा असून यासंदर्भात माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख यांनी मुद्दा उपस्थित करून ही जागा तातडीने नगरपालिकेने ताब्यात घ्यावी व नियोजनाप्रमाणे मालकाला ८१ लाख रुपये देण्यात यावेत व तेथे भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारावे, त्यास सभागृहाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन सत्ताधारी गटाने केले. त्याला पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांच्यासह सर्वानीच पाठिंबा दिला.
नगरसेवक अंजुम शेख म्हणाले, थत्ते मैदानाच्या जागेबाबत खोटेनाटे आरोप करण्यात आले. मात्र जयंतराव ससाणे यांनी थत्ते मैदान येथील जागा पालिकेकडेच आरक्षित ठेवून तेथे नागरिकांच्या सोयीसाठी जॉगिंग ट्रॅक बनविले आहे. या वेळी केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्नसुरक्षा विधेयक या गरिबांना अन्न देण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याला नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी अनुमोदन दिले. सर्वसाधारण सभेत इतिवृत्त कायम करणे, खर्ची पडलेल्या बिलास मंजुरीस पडलेल्या घरावरील आकारणी कमी करणे, पालिकेच्या मालकीच्या मंगल कार्यालय, नाटय़गृह आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, राजेंद्र महंकाळे, आशिष धनवटे, राजेश अलघ, विरोधी नगरसेविका भारतीताई कांबळे, मंजुश्री मुरकुटे आदींनी चर्चेत भाग घेतला.