पाणी वापराची नवी संस्कृती बनविताना ती विज्ञानाधारित बनवावी लागेल. पाण्याचा अन्य जिवांशी असलेले संबंध लक्षात घेऊन त्याचे नियोजन करावे लागेल. जलसंस्कृतीची जोपासना करताना तिच्याशी ऊर्जा संस्कृतीचा सांधा जोडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या वतीने येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये काल शनिवारी आठवे जलसाहित्य संमेलन सुरू झाले. त्याच्या समारोप प्रसंगी श्री. चितळे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
आतापर्यंत जलसाहित्य संमेलनाने जनमानसात प्रबोधनाचे काम केले आहे. आता जल निर्मळतेकडे नेणारे कार्य व जल समस्येवर उत्तर शोधणाऱ्या उपाययोजना अमलात आणणे हे खरे आव्हान आहे, असा उल्लेख करून चितळे म्हणाले, पूर्वीच्या तुलनेने पाण्यची उपलब्धता तितकीच असली तरी वापर मात्र चौपट झाला आहे. पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन ही गरज बनली आहे. त्यासाठी पाणी वापराचे वैचारिक विश्लेषण करताना जे निष्कर्ष समोर येतील त्यातून काही भावनिक प्रश्न निर्माण होतील. त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचा सामूहिक पुरुषार्थ दाखवावा लागेल.    
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, आपल्या पूर्वजांनी जलसंस्कृतीचे जतन केले आहे. ही परंपरा आधुनिक संदर्भ देऊन वाढविण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे. भारतीय जलसंस्कृती मंडळाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील उपस्थित होते.
दिवसभरात विविध विषयांवर तीन चर्चासत्रे झाली. एमआयडी नवी दिल्लीचे माजी महासंचालक आर. आर. केळकर यांची प्रकट मुलाखत झाली. प्रा. अतुल आयरे व पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांना बोलते केले. केळकर म्हणाले, निसर्गाने पावसाच्या रूपाने जे पाणी दिले आहे त्याच्याशी नेमकेपणाने जुळवून घेतले पाहिजे. पाण्याचा बेपर्वा वापर थांबवून त्याचे नियोजन झाले पाहिजे. पावसाचा कालावधी आपल्याकडे चार महिन्याचा आहे. उर्वरित कालावधीत त्याची योग्य साठवण करून योग्य वापर करण्याचे नियोजन आपल्या हाती आहे. ग्लोबल वार्मिंग या विषयाचा बाऊ करता कामा नये. हवामान बदलाचा निष्कर्ष घाईघाईने काढू नये.