कुल्र्याच्या नेहरूनगर महानगरपालिका शाळेत सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे येथील ‘महाराष्ट्र नाईट हायस्कुल’मध्ये शिकणाऱ्या रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना वर्गाअभावी व्हरांडय़ात बसून शिकावे लागत आहे. पालिका शाळा मुख्याध्यापकांच्या अडवणुकीमुळे याच इमारतीत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दुरूस्त होऊन तयार झालेले वर्ग तर सोडाच पण साध्या स्वच्छतागृहातही रात्रशाळेच्या मुलांना प्रवेश देण्यात येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वर्ग नाही. बसायला बाके नाहीत. स्वच्छतागृहे नाही. त्यात रात्रीही दुरूस्तीचे काम सुरू असल्याने व्हरांडय़ात वर्ग सुरू असताना होणारी ‘धुळवड’ आणि ध्वनिप्रदुषण. जीव मुठीत धरूनच विद्यार्थी व्हरांडातल्या सतरंजीवर बसून अपुऱ्या प्रकाशात शिकत असतात. दिवसा काम करून किंवा घरी भावंडांना सांभाळून रात्री सात ते दहामध्ये शिकणाऱ्या मुलांना या शाळेत यावेसे तरी का वाटावे? परिणामी, जून, २०१२मध्ये सुमारे ३००च्या वर असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवाळीनंतर रोडावू लागली आहे. आता तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीअभावी शाळेच्या अनुदानित तुकडय़ांवर व पर्यायाने शिक्षकांच्या संख्येवरही शालेय शिक्षण विभागाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. कारण, दरम्यानच्या काळात झालेल्या पाहणीत उपस्थिती कमी आढळून आल्याने विभागाने शाळेच्या तुकडय़ा कमी का करू नयेत, अशा नोटीसा पाठवून शाळेला हैराण करण्यास सुरूवात केली आहे.
नेहरूनगरच्या या पालिका शाळेच्या चार मजली इमारतीत पालिकेच्याच मराठी, हिंदी, उर्दू या शाळा चालतात. १९९३-९४ साली गिरगावात चालणारी ‘संयुक्त महाराष्ट्र प्रसारक मंडळा’ची रात्रशाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. स्वातंत्रसैनिक आणि माजी आमदार सी. स. सावंत यांनी गिरणागावातील मुलांना शिकता यावे या उद्देशाने चालविलेल्या या शाळेला गिरगावात विद्यार्थी मिळेनासे झाल्याने ती येथे हलविण्यात आली होती. नेहरूनगरमध्ये लाल डोंगर, जागृती नगर, सिद्धार्थ नगर या भागातील बहुतांश गरीबवस्ती आहे. या वस्तीतील गरीबी किंवा घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून, दुरावलेल्या, कुठेच प्रवेश न मिळालेल्या किंवा दिवसा हॉटेल किंवा तत्सम ठिकाणी काम करून रात्री शिकणाऱ्या मुलांना या शाळेमुळे आधार मिळाला. शिवाय जवळच असलेल्या आदित्य बिर्ला अनाथालयातील मुलेही या शाळेत आली. जून, २०१२मध्ये या शाळेची पटसंख्या ३०८ विद्यार्थी इतकी होती. सध्या शाळेत सहावी ते दहावीपर्यंतच्या १० तुकडय़ा आहेत. पण, आता इमारतीच्या दुरूस्तीच्या कामामुळे ही पटसंख्या ८०वर आली आहे.
तळ आणि पहिल्या मजल्यावरील १२ वर्गाचे भाडे शाळा पालिकेला देते. या वर्गाची आता दुरूस्ती सुरू असल्याने शाळेला वरच्या मजल्यावरील नवीन दुरूस्ती झालेले वर्ग मिळणे अपेक्षित होते. या संबंधात दोनवेळा मुख्याध्यापक आणि इमारतीचे व्यवस्थापक मोहम्मद जाबीर यांना शाळेने पत्र देऊनही दाद मिळालेली नाही. जाबीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही लवकरच तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील वर्ग शाळेला देऊ असे सांगितले. पण, आतापर्यंत शाळेला वर्ग का देण्यात आले नाही असे विचारता त्यांनी वरच्या मजल्यावर चालणाऱ्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने वर्ग देता आले नाही, असे उत्तर दिले.