नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने ३० व ३१ जानेवारी रोजी ‘निमा बँक समिट २०१३’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन निमा हाऊस येथे झाले.
या प्रसंगी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, मनिष कोठारी, माजी अध्यक्ष डी. जी. जोशी, नरेंद्र हिरावत, तुषार अंधृटकर, सचिव सी. एस. के. मेहता, मिलींद चिंचोलीकर, चंद्रशेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक चिंचोलीकर यांनी स्वागत केले. परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना बँकांच्या कार्यपद्धतीची माहिती, कर्ज व बँकेच्या विविध योजनांची माहिती यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. बेळे यांनी नाशिकच्या उद्योजकाला जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, उच्च दर्जाचे उत्पादन करण्याची गरज आहे, त्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. उद्योगांना कमीतकमी व्याजदरात कर्ज पुरवठा व्हावा, बँकांच्या विविध योजनांचा फायदा व योजना उद्योजकांना समजाव्यात आणि कार्यपद्धती समजावी यासाठी परिषदेचे आयोजन केल्याचे बेळे यांनी सांगितले.
उद्योजकांना स्थानिक, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी स्पर्धा करण्यासाठी उत्पादनाचा उत्तम दर्जा, वेळेत ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहचविणे आवश्यक असते. उत्पादनापासून ते बाजारपेठेत नेईपर्यंत या सर्व प्रक्रियेत उद्योजकांची आर्थिक स्थिती भक्कम असणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजक विविध प्रकारे कर्ज स्वरुपात पैसा उभारतो. त्याकरिता बँकेत कागदपत्रांची पूर्तता करणे, बँकेत भेट देणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उद्योगांची हीच गरज ओळखून या परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.