आज अनेक आव्हांनाना लिलया पेलत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. येथील महापारेषण कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनी विभागातील कनिष्ठ अभियंता नीता खारकर आणि विशाखा खोडके यांनीही आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या महापारेषणच्या कामाला न्याय देत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, हे सिद्ध केले आहे.
महापारेषणमध्ये २०१० साली मोठय़ा प्रमाणात कनिष्ठ अभियंत्यांची भरती झाली. यात पहिल्यांदाच महिलांचाही समावेश करण्यात आला. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिला पाहिजे तशी कामगिरी करू शकणार नाही, असा समज येथील अधिकाऱ्यांचा होता, मात्र महिलांनी जिद्द आणि समर्पणाच्या बळावर हा समज तो समज खोडून काढला. उच्च दाबाच्या वाहिन्या हाताळणाऱ्या एचव्हीडीसी विभागातील नीता आणि विशाखा या महिला अभियंत्यांची जोडगोळी कामात तत्पर व समर्पित अशीच ओळख संपूर्ण विभागात आहे. कामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची अद्यावत माहिती संगणकावर नोंदवणे, कामाला लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे, वेगवेगळय़ा कार्यालयाशी संपर्क साधणे, पत्रव्यवहार करणे, बैठकांची माहिती वरिष्ठांकडे पाठवणे, कामांचा आढावा घेणे, निविदा मागवणे याबरोबरच अतिशय जोखमीच्या महापारेषणच्या विविध तांत्रिक मोहिमेवरही या महिला अधिकारी काम करतात. कितीही जोखमीचे काम असले तरीही ही जोडगोळी काम करण्यास सदैव तत्पर असते. इतकेच नव्हे, तर सकाळ, दुपार व रात्र पाळीतही काम करतात. या दोन्ही महिला अधिकारी उंच अशा विद्युत खांबावर चढून कामही करतात. नियंत्रण कक्षातही आपली जबाबदारी सजग राहून पार पाडतात. आवश्यकता भासल्यास कार्यालयीन वेळेच्या अधिकही काम करतात.
आणीबाणीच्या परिस्थितीत गोंधळून न जाता योग्य पर्याय शोधणे व कुठल्याही नवीन गोष्टीत पुढाकार घेणे हे विशाखाचे तर अत्यंत नम्रपणे आपल्या अडचणी वरिष्ठांपुढे मांडणे हे नीताचे कौशल्य आहे. अनेकदा तातडीच्या प्रसंगी नीता कामावर नसतांनाही धावून येते. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या नीताला कामाव्यतिरिक्त गायन व अभिनयात आवड आहे. कंपनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाटय़स्पध्रेत तिने सादर केलेल्या ‘आक्ट’ या नाटकातील भूमिकेसाठी सवरेकृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळवला. किमान कार्यकारी अभियंता या पदावर पोहोचता यावे, असे ध्येय तिने उराशी बाळगले आहे, तर विशाखा हिने बेताच्या परिस्थितीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून महापारेषणला नोकरी मिळवली. आपल्या आयुष्यात जे कुठलेही काम स्वीकारले त्यास शंभर टक्के न्याय द्यायचा, हे तिचे ध्येय आहे. या दोघींनी अतिशय उत्कृष्टपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा परिणाम या खात्यात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या इतरही महिलांचा मार्ग सुकर झाला आहे. महिलांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्या उत्कृष्ठ कामगिरी बजावू शकतात, असे मत कार्यकारी अभियंता सुनील सरडे आणि अविनाश निंबाळकर यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
नीता खारकर-विशाखा खोडके महापारेषणच्या आधारस्तंभ!
आज अनेक आव्हांनाना लिलया पेलत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
First published on: 08-03-2013 at 04:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita kharkar vishakha khodke saporter of mahapareshan