त्र्यंबकेश्वर येथे बुधवारपासून संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवास सुरूवात होत असून त्यासाठी नगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून िदडीव्दारे लाखो वारकरी शहरात दाखल झाले असून राज्य परिवहन महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर दरम्यान १०० पेक्षा अधिक जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे.
खांद्यावर भागवत धर्माची पताका, सोबतीला टाळ मृदंगाचा गजर, मुखी संताचे अभंग अशा भक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण त्र्यंबक नगरी न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत आहे. यात्रेसाठी राज्यभरातून शेकडो दिंडय़ा नगरीत दाखल झाल्या आहेत. पालख्यांचे ठिकठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यासाठी रस्त्यारस्त्यावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्र्यंबक पालिकेने यात्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या वाहनतळ नाक्यावर दिंडय़ांचे नारळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत आहे. शहर परिसरातही सर्वत्र भगवे झेंडे आणि पताका दिसत आहेत. नाशिक, वैतरणा, जव्हार अशा तिन्ही मार्गाकडून दिंडय़ा शहरात येत आहेत. त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या पालख्या, वारकरी कुशावर्तात स्नान करत त्र्यंबकराजाचे दर्शन, निवृत्तीनाथांचे दर्शन व फडावर मुक्काम या पध्दतीने आपल्या कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. यात्रेसाठी मेनरोड, कुशावर्त परिसर आदि ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. खड्डे डांबराने बुजविण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. भाविकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पालिकेतर्फे जादा पाणी पुरवठा करण्यात येणार असून गरज भासल्यास टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ६६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जव्हार फाटा या दरम्यान दोन दिवस वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही दिवस गावातच तळ ठोकणार आहेत. रुग्णसेवेसाठी व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अहोरात्र वैद्यकिय सेवा उपलब्ध असून कुशावर्त पोलीस चौकी, मंदिर परिसर येथे प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे सोमवारपासूनच विशेष फेऱ्यांना सुरूवात करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक जादा गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली.