नवी मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रमुख पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने याबाबत तंत्रशुद्ध आखणी केली असून रविवारी ६२८ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वाशी येथे आटोपण्यात आल्या. राष्ट्रवादीत माजी मंत्री गणेश नाईक हे ठरवतील तो उमेदवार असल्याने मुलाखतींचा फार्स पूर्ण करण्यात आलेला नाही. त्याऐवजी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. काँग्रेसची ही औपचारिकता बुधवारपासून सुरू होणार आहे. भाजपने केवळ अर्जाची छाननी केली असून एका प्रभागात तब्बल २० अर्ज आल्याने नेतेदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.
नवी मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय हालचाली सुरू झाल्या असून शिवसेनेने यात आघाडी घेतली आहे. पालिकेच्या १११ प्रभागांसाठी शिवसेनेकडे ६२८ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यांच्या मुलाखती खास शिवसेना भवनावरून पाठविण्यात आलेले उपनेते विश्वनाथ नेरुरकर व रवींद्र मिर्लेकर यांच्या टीमने वाशी येथील आर्य समाज सभागृहात घेतलेल्या आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या हवश्या गवश्या उमेदवारांचाही समावेश होता. त्यांना उमेदवारी देण्याच्या कबुलीवर पक्षात प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे मूळ शिवसैनिक इच्छुक उमेदवारांच्यात अस्वस्थता पसरली आहे. मुलाखतीच्या दरम्यान या उपऱ्यांना बघून काही शिवसैनिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याची चर्चा आहे. इतर पक्षांतून शिवसेनेत आलेल्या आजी-माजी नगरसेवकांनी स्थानिक शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख यांना विश्वासात न घेतल्याने हा असंतोष जास्त खदखदत आहे. त्याचा स्फोट होण्याची शक्यता असून शिवसेनेतदेखील मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने नंतर राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली असून ९० टक्के उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीमधून पाच नगरसेवक फुटलेले असून त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी तीन नगरसेवक किंवा प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम ठोकणार आहेत. त्यानंतर ही गळती बंद होणार असून निवडणुकीला समोरे जाण्यासाठी नाईक कुटुंबीय रणांगणात उतरणार आहे. पक्षात नाईक हे सर्वेसर्वा असल्याने ते देतील तोच उमेदवार राहणार असून विधानसभा निवडणकीतील मतदान, प्रभाग रचनेतील अधिक भाग, नाईक निष्ठा हे निकष लावले जाणार आहेत. भाजपच्या सरचिटणीस वर्षां भोसले, युवा नेते वैभव नाईक, अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी यांनी ५०० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून एका प्रभागात २० ते २५ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याने स्थानिक नेतेदेखील आश्यर्यचकित झाले आहेत. राज्य पातळीवरील समिती या उमेदवारांच्या बाबतीत निर्णय घेणार असून ती पुढील आठवडय़ात येणार आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे धरण फुटले असल्याने अगोदर राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास राजी असलेला हा पक्ष आता एकला चलो रेचा नारा देणार असून १११ प्रभागांसाठी ३६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार झाले आहेत. या पक्षानेही ७० टक्के उमेदवारी जाहीर केली असून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी काँग्रेस नेते मुश्ताक अंतुले मुलाखतीचा फार्स पूर्ण करणार आहेत.
याशिवाय शेकापने आपल्या १२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यादी जाहीर करण्यामध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. एमआयएम आणि मनसेला अद्याप मुर्हूत लाभलेला नसल्याने दोन्ही पक्ष अंधारात चाचपडत आहेत. आरपीआयने युती करा अन्यथ: स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. हा पक्ष २८ जागा लढविण्यास तयार असून १८ जागांची भाजप शिवसेनेकडे त्यांची मागणी आहे. गेल्या वीस वर्षांत या पक्षाला कोणत्याही पक्षाने गांभीर्याने न घेतल्याने त्यांनाही एकला चलोच्या मार्गाने जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmc news
First published on: 17-03-2015 at 06:40 IST