केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या ‘आधार’ या राष्ट्रीय ओळखपत्रावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्याने या बहुउपयोगी ठरू शकणाऱ्या कार्डात मोठी उणीव राहून गेली आहे. ‘आधार कार्ड’ या नावाने लोकप्रिय असलेली ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ ची योजना केंद्राने सुरू केली आहे. यात मिळणारा विशिष्ट ओळख क्रमांक भविष्यात बँक, मोबाईल फोन कनेक्शन्स आणि इतर सरकारी व गैरसरकारी सेवांकरता उपयोगी ठरू शकेल अशी हमी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत २३ कोटी नागरिकांची या योजनेत नोंदणी झाली असून २१ कोटी आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. योजनेवर एव्हाना २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सध्या ओळखीसाठी वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, कार्यालयाचे ओळखपत्र, बँकेचे पासबुक यासारखे दस्ताऐवज बाळगावे लागतात. मात्र आधार कार्ड जवळ बाळगल्यास कुणालाही ओळख पटवून देण्यासाठी इतर कागदपत्रांची गरज भासणार नाही व त्यामुळे यावरील मर्यादा दूर होईल, असे मानले जात होते. इतर कागदपत्रांसोबत जन्मतारखेचा दाखलाही नागरिकांनी आधार कार्डाच्या अर्जाला जोडला होता. मात्र हे कार्ड मिळाल्यानंतर, त्यावर जन्मतारीख नमूद केलेली नसून फक्त जन्माचे वर्ष लिहिलेले असल्याचे लक्षात येते. त्यामुळे ज्या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे, तेथे या कार्डाचा उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या जागी जन्मवर्ष नोंदवण्यात आले आहे, त्याच ठिकाणी जन्मतारीख टाकली असती, तर संबंधित नागरिक आणि शासकीय यंत्रणा यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अनेक समस्या उद्भवल्या नसत्या.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे किंवा बस प्रवासात मिळणारी सवलत, सज्ञान किंवा अल्पवयीन व्यक्तींना बँकेत खाते उघडणे, गॅस कनेक्शनसाठी केवायसी अर्ज भरणे, मतदार यादीतील नावनोंदणी, पासपोर्ट, डिमॅट किंवा म्युच्युअल फंडाचे खाते उघडणे, ड्रायव्हिंग लायसन्स, प्राप्तीकर खात्याचे व्यवहार, मोबाईलचे सिमकार्ड इ. साठी ओळखपत्र, निवासाचा पुरावा आणि काही बाबतीत जन्मतारखेचा पुरावा इ. आवश्यक असतात. या सर्वासाठी ‘इंटिग्रेशन’ झाल्यानंतर आधार कार्डावरील डाटा सर्वच ठिकाणी कामी येऊ शकतो, मात्र तसे होईपर्यंत या वेगवेगळ्या पुराव्यांची गरज भासणार आहे.
अनेक व्यक्तींजवळ जन्मतारखेचा ठोस पुरावा देणारे कागदपत्र असूनही त्यांची जन्मतारीख आधार कार्डावर नोंदली गेलेली नाही. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँकेतील खात्यासाठी संबंधित व्यक्ती जन्मतारखेचा जो पुरावा देते, तो ग्राह्य़ मानला जातो. तसेच आधार कार्डाच्या बाबतीतही करता आले असते, परंतु तसा विचार झालेला दिसत नाही. या कार्डावर जन्मतारीख नमूद असली, तर संबंधितांना वेगवेगळ्या सेवांसाठी दुसरे कुठलेही कार्ड जवळ बाळगावे लागणार नाही.
आधार कार्डावर जन्मतारीख नमूद करण्याची सूचना अविनाश प्रभुणे या जागरूक नागरिकाने यूआयडीच्या अधिकाऱ्यांना एका महिन्यापूर्वी ई-मेल पाठवून केली होती.
या कार्डावर जन्मतारीख नमूद न करण्याचे नेमके कारण काय, अशीही विचारणा त्यांनी केली होती. परंतु त्यांना काही उत्तर मिळालेले नाही.
आधार कार्डावर जन्मतारखेची नोंद करण्यात आल्यास त्याचा वेगवेगळ्या व्यवहारांसाठी उपयोग होईल आणि या कार्डातील एक मोठी उणीव दूर होईल, असे प्रभुणे यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘आधार’ कार्डावर जन्मतारखेचा उल्लेख नाही
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या ‘आधार’ या राष्ट्रीय ओळखपत्रावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्याने या बहुउपयोगी ठरू शकणाऱ्या कार्डात मोठी उणीव राहून गेली आहे.
First published on: 11-12-2012 at 01:04 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No birth date on adhar card