हेलिकॉप्टरमधून महाराजांना सप्ताहाला घेऊन जाण्याचे फॅड आता भाविकांमध्ये आले आहे, पण सरालाबेटाचे महंत रामगिरीमहाराज यांना ते मान्य नाही. लोकांनी हेलिकॉप्टरवर अनावश्यक खर्च करू नये, फार तर वाचलेले पैसे बेटाच्या विकासकामासाठी द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महंत नारायणगिरीमहाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून रामगिरीमहाराज यांची नियुक्ती झाली. त्यानंतर रामगिरी यांनी सरालाबेटाचा विकास चालविला आहे. कोटय़वधी रुपयांची कामे त्यांनी केली आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी चार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली. सध्या ही कामे सुरू आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संस्थानच्या शेतीविकासासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून २० लाखाचा निधी मंजूर केला. असे असले तरी बेटाच्या विकासासाठी आर्थिक टंचाई जाणवत आहे.
महंत रामगिरी यांना गंगागिरीमहाराजांच्या भेंडे येथे झालेल्या सप्ताहाच्या वेळी हेलिकॉप्टरने बेटावरून नेण्यात आले. त्यापूर्वी नांदगाव तालुक्यात झालेल्या सप्ताहालाही भुजबळ यांनी हेलिकॉप्टरने रामगिरी यांना नेले होते. िपपळवाडी येथील सप्ताहाकरिताही त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यात आले. यापुढे हेलिकॉप्टरने सप्ताहाला नेण्याचा हट्ट कोणी धरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सरालाबेट येथे आज सद्गुरू गंगागिरीमहाराजांच्या १११व्या पुण्यतिथी सोहळय़ाची सांगता मोठय़ा उत्साहात झाली. नववर्षांचा योग जुळून आल्याने लाखो भाविक या वेळी उपस्थित होते. कृषिमंत्री विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आर. एम. वाणी, दीपक पटारे, संजय निकम, साबीरभाई शेख, राजश्री ससाणे, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
महंत रामगिरी या वेळी म्हणाले, संसारात जे रमतात त्यांचा संसार चांगला होतो. परमार्थातही जे रमतात त्यांचा परमार्थ चांगला होतो, असे सांगितले. विखे यांनी गोदावरी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना फळबागा व आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळावे म्हणून २० लाख रुपये खर्चाचा पथदर्शी प्रकल्प सरालाबेटावर राबविल्याचे त्यांनी सांगितले.
कृषिमूल्य आयोगाची स्थापना
राज्यात कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती विखे यांनी येथे दिली. ते म्हणाले, नव्या वर्षांत या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार मिळेल.