शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पद्मकांत कुदळे ह्य़ांचे पुत्र कै. पुरब यांचे निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून द्यावे, असा कोणताही प्रस्ताव त्यांचे कुटुंबीय व इतर कुणाकडून आला नव्हता. त्यामुळे बिनविरोध निवडीचा शब्द देण्या-घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शंकरराव कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे की, त्यांनी खरोखरच प्रस्ताव दिला असता तर पुढील नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने कै. पूरब यांच्या पत्नीची बिनविरोध निवड करून नगराध्यक्षपदही बहाल केले असते. परंतु ते व त्यांचे कुटुंबीय दु:खाचे छायेत असल्याकारणाने अशा प्रकारची राजकीय चर्चा करणे सयुक्तिक नव्हते. कुदळे यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकसेवा आघाडीने उमेदवार देण्याचे निश्चित केले. मतदारांनी लोकसेवा आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आढाव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.