महाराष्ट्राच्या राजधानीत पर्यटन भवन उभारण्यास जागा मिळत नसल्याने चार वर्षांंपासून या भवनाच्या उभारणीसाठी मंजूर झालेला २२ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने वारंवार विविध खात्यांकडे यासाठी पाठपुरावा करूनही अद्याप त्यांना जागा देण्यासंबंधी कोणतीही हालचाल झालेली नाही.
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी एखादे माहिती केंद्र किंवा पर्यटन भवन असावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे देश विदेशातून पर्यटक येत असतात. केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पर्यटन महामंडळांचीही माहिती येथे पर्यटकांना उपलब्ध होईल, असे या प्रस्तावात म्हटले होते. त्यासाठी मुंबईत १० ते १२ हजार चौरस मीटरची जागेवर एकच पर्यटन भवन उभारलेले असावे अशी योजना या प्रस्तावामागे होती. राज्य शासनानेही २२ कोटी रुपयांचा निधी या भवनासाठी २००८ मध्ये मंजूर केला होता. तथापि, आजतागायत पर्यटन भवनास कोठेही जागा मिळालेली नाही.
पर्यटन महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये मरीन ड्राइव्ह येथे असणाऱ्या तारापोरवाला मत्स्यालयाच्या इमारतीची जागा पर्यटन भवनासाठी द्यावी, अशी मागणी राज्य शासनाच्या अंदाजसमितीने मुख्य सचिवांकडे केली होती. मात्र त्यावर दुग्धविकास, मत्स्योद्योग आणि पशुविकास या खात्यांपैकी एकाही खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. याचप्रमाणे एमएमआरडीए, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, म्हाडा यांच्याकडेही जागेची मागणी करण्यात आली. तथापि, कोणीही जागा देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.