शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून किती गळती होते, यासंबंधी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या वरसगाव धरणातून १.७० टक्के आणि बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या टेमघर धरणातून ९ टक्के गळती होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ब्रिटिशांनी १४५ वर्षांपूर्वी बांधलेल्या खडकवासला आणि ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पानशेत धरणातून मात्र गळती होत नसल्याचीही माहिती मिळाली आहे.
पुणे जिल्ह्य़ातील धरणांमधून किती पाणी गळती होते, या संबंधीची माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी माहिती अधिकारात मागितली होती. अतिशय जुन्या अशा खडकवासला आणि पानशेत धरणांमधून गळती होत नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच वरसगाव धरणातील गळतीसंबंधीच्या गेल्या तीन वर्षांतील माहितीची छाननी केली असता या धरणातून १.७० टक्के गळती होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याबरोबरच टेमघर धरणातून ९ टक्के गळती होत असल्याचेही आकडेवरीवरून दिसत आहे.
जगभरात कालानुरूप अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत असताना गेल्या काही वर्षांत बांधलेल्या धरणांमधून पाण्याची गळती होत आहे आणि अतिशय जुन्या धरणांमधून गळतीच होत नाही, हे नक्की कशाचे निदर्शक आहे, असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. याहून गंभीर बाब म्हणजे राज्य शासनाच्या नाशिक येथील डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील सर्व धरणांचा २००७ साली सुरक्षिततेसंबंधी जो अहवाल तयार करण्यात आला होता, त्यातही टेमघर आणि वरसगावमधील गळतीबाबत स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती. गळती व दोषही अहवालात दाखवून देण्यात आले होते. तसेच त्यावरील उपायही या अहवालात सुचविण्यात आले होते, अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली.
गळतीबाबत अहवाल आल्यानंतरही उपाययोजना झालेली नसल्याचेच दिसत असून जर काही उपाययोजना केली गेली असेल, तर मग गेल्या तीन वर्षांतही गळतीचीच आकडेवारी का समोर आली आहे, अशीही विचारणा करण्यात आली आहे. गळतीबाबत उपाययोजना केली गेली नाही, तर धरणांचे आयुष्य कमी होते हे वास्तव असूनही त्याबाबत कार्यवाही का केली गेली नाही, २००७ सालातील अहवालाकडे दुर्लक्ष का झाले याची चौकशी करावी तसेच ही गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.