कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाला आता व्यापक स्वरूप येत असून, शासनाची सक्त ताकीद असतानाही आता शासकीय कर्मचाऱ्यांपाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. शासनाच्या वतीनेच राबविल्या जाणाऱ्या एखाद्या योजनेसाठी आकारल्या जाणाऱ्या टोलला आता शासकीय पातळीवरही विरोध दिसू लागला आहे.
कोल्हापुरातील टोलला नुकताच शासकीय कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनातून पाठिंबा व्यक्त केला होता. यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित आंदोलनाची गंभीर दखल घेत असे आंदोलन यापुढे झाल्यास कडक कारवाईचे आदेश बजावले आहेत. दरम्यान, या पाश्र्वभूमीवर आज ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या दहा संघटनांनी टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलनाला शुक्रवारी पाठिंबा दिला. वर्कर्स फेडरेशन, इंटक, एसईए, कार्यालयीन कर्मचारी संघटना, श्रमिक काँग्रेस आदी विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज काळय़ा फिती लावून काम केले. प्रवेशद्वारावर जमलेल्या कर्मचाऱ्यांनी टोल आकारणीच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, की मुंबईत हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ईस्टर्न फ्री वे ला टोल आकारला जाणार नाही. मग कोल्हापुरातच शहरांतर्गत रस्त्यांसाठी आम्ही टोल का द्यावा, शहरांतर्गत रस्त्यांसाठी राज्यात कोठेही टोल आकारला जात नाही. पण कोल्हापूरकरांवर तो लादला जात आहे. सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या कोल्हापूर जिल्हय़ाच्या बाबतीत शासनाकडून नेहमीच दुजाभाव होतो. शासनातील बडे अधिकारी व मंत्र्यांनी आयआरबी कंपनीला टोलवसुलीस परवानगी देऊन जणू खंडणी वसूल करण्याचा परवानाच दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. ८ जुलै रोजी टोलविरोधात महामोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
वीज कर्मचारी संघटनेचे नेते विष्णू जोशीलकर यांनी टोलविरोधी लढय़ात वीज वितरणचे सर्व कर्मचारी सहभागी असल्याचे सांगितले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांची भक्कमपणे साथ राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक यांच्यासह टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते तसेच कर्मचारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
टोलविरोधी आंदोलनात आता ‘महावितरण’चे कर्मचारीही
कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाला आता व्यापक स्वरूप येत असून, शासनाची सक्त ताकीद असतानाही आता शासकीय कर्मचाऱ्यांपाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे.

First published on: 15-06-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now agitation against toll by mahavitaran employee