मुंबईच्या बॉम्बशोधक पथकातील श्वानांना आता वातानुकुलित वाहने मिळणार आहेत. बॉम्ब शोधून काढताना त्यांची दमछाक होते हे लक्षात घेऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना वातानुकुलित वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बॉम्बशोधक पथकात आता बॉम्ब हाताळण्यासाठी रोबोट आणि बॉम्ब वाहून नेणाऱ्या खास वाहनांचाही समावेश होणार आहे संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्याचे तसेच बॉम्ब आढळल्यास तो निकामी करण्याचे काम बॉम्बशोधक आणि बॉम्ब नाशक पथक अर्थात ‘बीडीडीएस’ विभाग करत असतो. प्रशिक्षित पोलीस आणि अत्याधुनिक साधने असली तरी खऱ्या अर्थाने बॉम्बचा शोध प्रशिक्षित श्वानच घेत असतात. सध्या या विभागाकडे परदेशी लॅब्रेडॉर जातीचे १९ श्वान आहेत. त्यांना बाहेरच्या वातावरणाचा आणि उन्हाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांच्या कामावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. स्टेडियम आणि मैदानाची पाहणी करतांना हे श्वान मध्येच दमून धापा टाकायला लागतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व लक्षात घेऊन या श्वानांना आराम मिळावा तसेच त्यांच्या प्रकृतीला मानवेल, असा थंडावा मिळावा यासाठी वातानुकूलित गाडय़ा असाव्यात, असा प्रस्ताव विभागातर्फे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३ गाडय़ा मंजूर झाल्या आहेत. हा विभाग सशक्त आणि मजबूत करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे अतिरीक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
* १० किलोचा स्फोट सहन करणारे वाहन
बीडीडीएसकडे बॉम्ब निकामी करण्यासाठी एक अत्याधुनिक बॉम्बनाशक वाहन आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी बारा वाहने आहेत. या शिवाय स्फोटके तपासण्यासाठी विशेष यंत्र आहे. पंरतु आता एखादा बॉम्ब सापडल्यास तो निकामी करण्यासाठी मनुष्याऐवजी यंत्रमानव असलेल्या वाहनाचा (रोबोट ऑपरेटेड व्हेहिकल) वापर केला जाणार आहे. हे यंत्रमानवचलित वाहन बॉम्ब असलेल्या ठिकाणी जाऊन तो बॉम्ब नियंत्रक वाहनात (टोटल कन्टेंटमेंन्ट व्हेहिकल) ठेवून दूर घेऊन जाईल. या बॉम्ब नियंत्रक वाहनाची क्षमता १० किलो वजनाच्या बॉम्बचा स्फोटही सहन करण्याची आहे. घटनास्थळी सापडलेल्या बॉम्बचा या वाहनात स्फोट झाला तरी बाहेर काहीच फरक पडणार नाही. अशा प्रकारचे यंत्रमानव असलेले वाहन आणि बॉम्ब वाहून नेणारे वाहन प्रथमच मुंबई पोलिसांच्या या विभागात समाविष्ट होणार आहे.लहरींच्या (फ्रिक्वेन्सी) माध्यामातूनही बॉम्बस्फोट केले जातात. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा अथवा कार्यक्रमाच्या वेळी मोबाइलच्या लहरी बंद करण्यासाठी जॅमर बसवले जातात. मात्र या जॅमरमुळे सर्वांचेच मोबाइल बंद होतात. परंतु आता बीडीडीएसमध्ये अत्याधुनिक जॅमर आणण्यात येणार आहे. या जॅमरमुळे पोलीस, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, नोंदणी केलेले पत्रकार आदी सोडून इतरांचे मोबाईल जॅम करता येऊ शकतील.
* प्रशिक्षणासाठी अमेरिकेत
सध्या बीडीडीएस विभागात १६४ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. त्यात २ पोलीस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १७ पोलीस उपनिरीक्षक अशा २४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या तांत्रिक विभागातील ९० कर्मचारी या विभागासाठी काम करत असतात. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येत आहे. तर आता बीडीडीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2012 रोजी प्रकाशित
बॉम्बशोधक श्वान फिरणार एसी गाडीतून
मुंबईच्या बॉम्बशोधक पथकातील श्वानांना आता वातानुकुलित वाहने मिळणार आहेत. बॉम्ब शोधून काढताना त्यांची दमछाक होते हे लक्षात घेऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना वातानुकुलित वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First published on: 12-12-2012 at 11:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now anti bomb squads dogs now travel in air condition van