पत्नी समजून भलत्याच तरुणीवर झालेल्या हल्ल्याची पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाडीच्या गुन्ह्य़ांना आळा बसावा यासाठी पोलिसांच्या साप्ताहिक बैठकीत वेळोवेळी सूचना केल्या जात असल्या तरी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये वा छेडछाडीला वाव मिळू नये यासाठी अधिक कठोर होण्याचे पोलीस ठाण्यांना बजावण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या अशा सार्वजनिक ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची पाळत ठेवून गुन्हेगारांना तेथेच प्रतिबंध घातला जावा, अशी योजना आकार घेत आहे. लवकरच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना तशा सूचना केल्या जाणार असल्याचे अतिवरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
दादर येथील घटना अनपेक्षित असली तरी या घटनेनंतर आम्ही अधिकच सतर्क झालो आहोत. महिलांविरुद्धच्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्य़ाची तातडीने दखल देण्याचे आदेश आपण दिले आहेतच; परंतु छेडछाडच होऊ नये, पोलिसांचा वचक राहावा या हेतूने काही योजना आपण आखत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. सिंग यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले. कुठल्याही परिस्थितीत पोलिसांचा वचक संपुष्टात येता कामा नये. पोलिसांची जरब बसायलाच हवी. त्यामुळे पोलिसांचा रस्त्यावरील वावर अधिकाधिक वाढविण्यावर आपण भर देणार असल्याचेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
आपण सूत्रे स्वीकारली तेव्हाच कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुन्ह्य़ांची संख्या वाढली तरी हरकत नाही. त्याबद्दल आपण काहीही विचारणार नाही. परंतु लोकांच्या विशेषत: महिलांच्या तक्रारी अधिकाधिक दाखल व्हाव्यात आणि संबंधितांना जरब बसावा, अशा सूचनाही आपण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपींना पोलिसांचे भय वाटलेच पाहिजे. तशा सूचनाही आपण दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांची यादी करून बीट मार्शल वा गस्तीवरील पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठ निरीक्षकांना याआधीच देण्यात आल्या आहेत. त्याची तपासणी होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.