सदाशिव पेठेत ‘क्लस्टर हाऊसिंग’ या संकल्पनेअंतर्गत ‘९ सदाशिव’ हा निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारला जाणार असून, त्यामुळे या परंपरागत पेठेचे रूप पालटणार आहे.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत ख्याती असलेल्या ‘पिनॅकल समूहा’तर्फे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. क्लस्टर हाऊसिंग म्हणजे जागेची कमतरता असलेल्या शहराच्या मध्यवस्तीत जुन्या इमारती किंवा वाडय़ांचा स्वतंत्रपणे पुनर्विकास करण्याऐवजी एकमेकांना लागून असणाऱ्या इमारती व वाडय़ांचा एकत्रित पुनर्विकास करणे. सदाशिव पेठेतील अशा प्रकल्पासाठी तेथील ९ वाडय़ांमध्ये राहणारे ८७ हून अधिक लोक आणि पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती पिनॅकल समूहाचे अध्यक्ष गजेंद्र पवार आणि संचालक रोहन पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
हा प्रकल्प दोन एकर भूखंडावर उभा राहणार आहे. तेथे २ व ३ बीएचके आरामदायी सदनिका, दुकाने आणि कार्यालये दिली जाणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात येत्या शुक्रवारी (४ जानेवारी) होणार असून, तो २०१५ च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.