अपघाती मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने त्यांच्या सर्व सदस्यांसाठी एका अभिनव उपक्रमाची आखणी केली असून, अपघातामुळे होणारा वैद्यकीय खर्च, अपघाती मृत्यूनंतर सदस्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च असा दोन्ही प्रकारचा खर्च एका विमा कंपनीच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही बाबींचा समावेश असलेल्या कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सव्‍‌र्हिसेसतर्फे राबविण्यात येणाऱ्या दोन अल्प किंमत असलेला विमा सर्व सदस्यांसाठी काढण्यात आला आहे. ही योजना ग्रुप पॉलिसी असून, यात कमीतकमी ५० सभासद आवश्यक आहेत.
सदस्यांसाठी या विम्याचा हप्ता फक्त ४९ रुपये आहे. यात चालकाचा   अपघाती  मृत्यू झाल्यास त्याच्या एका बालकाचा बालवाडी ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च विमा कंपनीतर्फे करण्यात येईल.
शाळेत जाण्या-येण्यासाठीचा बस प्रवासाचा खर्च यांसह सर्व शैक्षणिक खर्चाचा समावेश विमा कंपनीचे पालक या नात्याने करणार आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने गणेश जयंतीचे औचित्य साधून एका कार्यक्रमात या योजनेतंर्गत विम्याची रक्कम स्वीकारली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नय्या खैरे, असोसिएशनचे अध्यक्ष अंजू सिंघल, मुख्य सचिव अवतारसिंग बिर्डी,  श्रीधर  व्यवहारे हे उपस्थित होते.