खासगी कंपन्यांच्या स्पर्धामधून तावूनसुलाखून निघाल्यानंतर मिळणाऱ्या पगाराच्या ‘ऑफर्स’ही चांगल्याच भारी असल्याने बी-स्कूलमधील विद्यार्थीही अशा स्पर्धावर नजर ठेवून असतात. ह्य़ुंदाई कंपनीने राष्ट्रीय स्तरावर नुकत्याच घेतलेल्या एका स्पर्धेत जेबीआयएमएसच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या कंपनीने देशभरातून १८जणांची निवड केली असून कंपनी स्वखर्चाने या मुलांना दक्षिण कोरिया येथील आपल्या मुख्यालयात घेऊन जाणार आहे. येथे कंपनीचा कारखाना, कार्यालय पाहण्याबरोबरच उच्चपदस्थांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. अर्थात या सोपस्कारातून पार पाडल्यानंतर कंपनी जी निवड करेल ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरची दारे खोलणारी असेल.
स्पर्धामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी बहुतेककरून पहिल्या वर्षांचे असतात. कारण, दुसऱ्या वर्षांचे विद्यार्थी सहसा परीक्षा आणि मुलाखतीच्या तयारीत गुंतलेले असतात. पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सामावणे कंपन्यांनाही सोयीचे होते. कारण, निवड झाल्यावर बहुतेक कंपन्या या मुलांना सुट्टीच्या काळात प्रशिक्षण देतात. काही मुले सुट्टीकाळात कंपन्यांमध्ये इंटर्नशीपला जातात. या इंटर्नशीपचा विद्यार्थ्यांना मिळणारा मोबदलाही काही लाख रुपयांच्या घरात असतो. शिवाय या काळात कच्चे मडके घडवावे तसे कंपन्या या मुलांना आपल्या वातावरणाला साजेसे प्रशिक्षण देतात. संबंधित कंपनीत काम करण्याची मानसिकता या काळात तयार होते. परिणामी नोकरीवर रुजू होताना अवघडलेपण येत नाही, असे जेबीआयएमसचे प्रा. बाळकृष्ण परब यांनी सांगितले. या माध्यमातून मिळणाऱ्या कंपन्यांच्या ऑफर्सही भल्याथोरल्या असतात. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणारे पॅकेजच बहुतेककरून विद्यार्थ्यांना मिळत असते. पण, काही हुशार मुलांच्या आकांक्षा इतका मोठय़ा असतात की त्यांना प्रत्येक वेळेस कंपन्यांकडून मिळणारी ऑफर योग्य वाटेलच असे नाही. अनेकदा २२-२३ वर्षांच्या तरुणांना त्यांच्यातील हुशारी ओळखून मोठय़ा मोठय़ा कंपन्या मॅनेजरपदाची नोकरी देऊ करतात. पण, केवळ काही कंपन्या आपल्या करिअरच्या पुढील पाच वर्षांचा करिअरविषयक आलेख देऊ शकत नाही, म्हणून तरुण मुले नोकरी नाकारतात.
आक्रमकता महत्त्वाची
एरवी मोठय़ांचे चुकले तरी मान तुकवायची किंवा तोंडातून शब्द काढायचा नाही, या बालपणापासून रुजविलेल्या संस्कारांना व्यवस्थापन क्षेत्रात काहीच स्थान दिले जात नाही. उलट समोरचा उमेदवार आपली बाजू किती तडफदारपणे मांडतो याला कंपन्या महत्त्व देतात. स्पर्धाच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करताना हुशारी तर तपासली जातेच. पण, एखादा उमेदवार हुशार असेल. पण, वादाची संधी आल्यास आपली बाजू आक्रमकपणे मांडण्याऐवजी गप्प बसून राहणाऱ्या उमेदवाराला कंपन्यांकडून तितकीशी पसंती मिळत नाही.