जलसंपदा विभागातील गैरकारभारांविषयी शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण समितीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी मांडलेली परखड मते आणि त्यामुळे उठलेल्या वादंगात अजित पवार यांना याआधी द्यावा लागलेला राजीनामा, शासनाने जलसंपदातील कारभाराविषयी प्रसिद्ध केलेली श्वेतपत्रिका, या सर्व घडामोडींमुळे विजय पांढरे या नावाचा अधिकाऱ्यांमध्ये एक नैतीक दरारा निर्माण झाल्याचे अनुभवयास मिळत आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात जळगाव जिल्ह्यातील उपसा जलसिंचनावर ताशेरे ओढणारे पांढरे नुकतेच येथे येऊन गेले. ‘भित्यापोटी ब्रम्हराक्षस’ या प्रमाणे त्यांच्या दौऱ्यानंतर येथील अधिकारी वर्ग कमालीचा धास्तावला आहे.
पांढरे यांनी राज्यातील सिंचनासंदर्भातील वस्तूस्थिती पत्राव्दारे मांडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा आधार घेत विरोधकांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठविली होती. या विषयावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली होती. पांढरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे अस्वस्थ झालेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होणे पसंत केले होते. शासनाला श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी लागली होती. त्यानंतर पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. या सर्व घटनाक्रमांत प्रथमपासूनच विजय पांढरे हे नाव गाजत राहिले.
 पांढरे यांनी आपल्या पत्रामध्ये ज्या ज्या प्रकल्पांविषयी आक्षेप नोंदविले होते, त्या सर्व प्रकल्पांची उपयुक्तता आणि दर्जा याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. जळगाव जिल्ह्यातील उपसा योजनांविषयीही पांढरे यांनी आपल्या पत्रात नाराजी व्यक्त केली होती.
या पाश्र्वभूमीवर पांढरे हे अचानक जळगावच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-वढोदा, धरणगाव, तळवेल, नशिराबादजवळील भागपूर व एरंडोल तालुक्यातील पद्मालय सिंचन व उपसा योजनांना अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह भेट दिली. कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
पांढरे यांनी जळगावचा दौरा आटोपता घेतला असला तरी ते नेमकं काय मत व्यक्त करतात, याविषयी तापी पाटबंधारे विभागातील अधिकारी धास्तावलेले आहेत.