महापालिकेच्या जन्म दाखला विभागातील भ्रष्टाचार वारंवार उघड होत असून या विभागातील भ्रष्टाचारामुळे संगणकाच्या युगात जन्म दाखला मिळवण्यासाठी पुणेकरांना दीड-दीड महिना वाट पाहावी लागत आहे. ही सर्व यंत्रणा तातडीने योग्य त्या पद्धतीने कार्यान्वित करावी आणि जन्म दाखले तीन ते पाच दिवसांत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
भाजपचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. महापालिकेच्या जन्म दाखल्यासंबंधीची प्रक्रिया अतिशय ढिसाळ पद्धतीने काम करत असून संगणकाच्या युगात दीड-दीड महिने दाखला मिळत नाही, त्यामुळे नागरिक हैराण होत आहेत, ही शरमेची बाब आहे. वास्तविक, सर्व यंत्रणा ऑनलाईन केल्यास ही प्रक्रिया पार पाडणे शक्य आहे. मात्र, या प्रक्रियेत पारदर्शकता येईल व त्यामुळे गैरकारभार करता येणार नाही, यासाठी या खात्यात कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत, असा आरोप येनपुरे यांनी यावेळी केला.
वास्तविक, या सर्व नोंदीसंबंधीचे रेकॉर्ड क्षेत्रीय कार्यालयांमधून रोज वा दर एक-दोन दिवसाआड कसबा पेठ येथील कार्यालयात आणणे शक्य असताना तसे केले जात नाही. त्यामुळे दाखले तयार व्हायला मोठा विलंब होतो. सर्व क्षेत्रीय कार्यालये शहरातच असल्यामुळे तेथील रेकॉर्ड तातडीने आणण्याचा निर्णय करावा. तसेच जन्मासंबंधींची नोंद सर्व रुग्णालयांकडून रोजच्या रोज मागवून घ्यावी. या पद्धतीने निर्णय घेतल्यास नागरिकांना तीन ते पाच दिवसात दाखले मिळू शकतील, असेही ते म्हणाले. नागरिकांना १ जानेवारीपासून तीन ते पाच दिवसात दाखले मिळाले पाहिजेत आणि तशी प्रक्रिया सुरू झाली नाही, तर १० जानेवारीपासून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असाही इशारा भाजपने दिला आहे.