शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू असलेल्या ‘स्वाईन फ्लू’ बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागपुरातील विविध रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता १२० वर जाऊन पोहचली आहे.
रामदास लांजे (५५) असे मृताचे नाव असून ते गोंदिया जिल्ह्य़ातील सडक अर्जुनी येथील रहिवासी आहेत. त्यांना २१ एप्रिलला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. २३ एप्रिलला त्यांच्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ते ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. उपचार सुरू असताना २ मे च्या रात्री त्यांचा मृत्यू झाला. मेडिकलच्या प्रशासनाने ४ मे रोजी लांजे यांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे जाहीर केले. १ जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत मेडिकलमध्ये ‘स्वाईन फ्लू’ने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील अन्य शासकीय व खासगी रुग्णालयात १२० जण मृत्युमुखी पडले आहेत.
‘स्वाईन फ्लू’ने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये नागपूर शहरातील ५८, नागपूर ग्रामीणमधील १२, वर्धा ६, गोंदिया ४, चंद्रपूर ४, भंडारा ४ आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील एका रुग्णाचा समावेश आहे. नागपूर मंडळाच्या बाहेरील १० जणांचा समावेश आहे. तसेच मध्यप्रदेशातील १८, आंध्रप्रदेशातील २ आणि छत्तीसगड राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नागपूर शहरातील विविध रुग्णालयात आजपर्यंत ५९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८२ ‘स्वाईन फ्लू’ बाधित रुग्ण बरे होऊन घरे गेल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाने  
दिली.
दरम्यान, मेडिकलमध्ये स्वाईन फ्लू बाधित एक रुग्ण दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ४० अंश सेल्सिअस तापमानात ‘स्वाईन फ्लू’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे
आहे. विदर्भाचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असतानाही स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळून येत असल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.