सिल्व्हर ओक शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उभारलेली संघटना हे एक क्रांतिकारी पाऊल असून आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी नाशिकमधील इतर खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही असेच संघटित व्हावे, असे आवाहन ‘सिटू’चे जिल्हा अध्यक्ष व सिल्व्हर ओक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. श्रीधर देशपांडे यांनी केले आहे.
शहरातील सिल्व्हर ओक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या फलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते. सिटूचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष कॉ. आर. एन. पांडे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या छाया देव यांनी या मंचची भूमिका स्पष्ट करताना खासगी शाळा एकीकडे भरमसाट फी वाढवत आहेत तर दुसरीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची पायमल्ली करत त्यांना योग्य पगार व इतर सुविधा देत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या अन्यायाविरुद्ध विद्यार्थी व पालकांप्रमाणेच खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन लढा उभारणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध लढाईचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे, हे स्पष्टपणे लक्षात आल्यामुळेच मंचने सिटू संलग्न अशा या संघटनेची बांधणी करण्यात पुढाकार घेतल्याचे सांगितले. पांडे यांनी जरी ही संघटना आज लहान असली तरी अधिकाधिक कर्मचारी त्यात सामील होतील असा विश्वास व्यक्त करून, सिटूच्या देशभरातील एक कोटीहून अधिक कामगारांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. नगरसेवक जायभावे यांनी नवीन संघटनेला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे डॉ. वाघ यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे सरचिटणीस विजय मरसाळे यांनी संघटना बांधणीचा पूर्वेतिहास मांडला. संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र पैठणकर, खजिनदार बाबुलाल भामरे व नितीन गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले.