गेले तीन महिने सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आठवडाभरापासून वेगाने उतरणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांत उत्तम प्रतीच्या कांद्याचे भाव थोडेथोडके नव्हे तर किलोमागे तब्बल २५ रुपयांनी खाली आहेत. आजघडीला घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ३५ रुपये किलोने विकला जात आहे. मात्र.. घाऊक बाजारातील ही स्वस्ताई सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत पोहोचू शकत नसून याला प्रमुख कारण किरकोळ व्यापारी आहेत. किरकोळ बाजारात अजूनही कांद्याचे भाव ६० ते ७० रुपयांच्या आसपास असून राज्य सरकारच्या स्वस्त भाजी विक्री योजनेला किरकोळ विक्रेते वाकुल्या दाखवत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दरम्यान, कांदा उतरत असला तरी उत्तम प्रतीचा बटाटा २० रुपयांनी, तर लसूण किलोमागे ८० रुपयांनी विकली जात आहे. टोमॅटोचे घाऊक दरही अद्याप चढेच असून किरकोळ बाजारात या दरांनी साठी ओलांडल्याचे चित्र दिसत आहे.
किरकोळीत कांदा महागच
गेल्या आठवडय़ापासून मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. मुंबई बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी दररोज सुमारे १०० ते १२० गाडी कांद्याची आवक आवश्यक असते. गेल्या काही महिन्यांपासून ही आवक ६० ते ८० गाडय़ांवर आली आहे. मात्र चार-पाच दिवसांपासून हा आकडा १०० गाडय़ांपर्यंत पोहोचू लागल्याने अवघ्या आठवडाभरात घाऊक बाजारातील कांद्याचे दर ६० रुपयांपासून ३५ रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत, अशी माहिती ‘कांदा-बटाटा आडत व्यापारी संघा’चे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. पाच दिवसांत किलोमागे २५ रुपयांनी कांदा स्वस्त झाला असला तरी किरकोळ बाजारात अजूनही उत्तम प्रतीचा कांदा ६० रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जात असल्याची कबुलीही रामाणे यांनी दिली.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कांद्याचे दर चढेच असून, एखाद-दुसरा अपवाद वगळल्यास त्यामध्ये घसरण झाली नसल्याने सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. भाजीपाल्यांच्या किरकोळ दरात सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने दीड महिन्यांपूर्वी स्वस्त दरात भाजीपाला विक्री योजना सुरू केली. किरकोळ बाजारातील अवाच्या सव्वा दरांवर सरकारचा वचक राहावा यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असा पणनमंत्र्यांचा दावा होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अशा प्रकारची सुमारे १२६ स्वस्त भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय डी-मार्ट, बिग बझार, मोर अशा खासगी वितरकांनाही स्वस्त भाजी विक्री योजना सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी किरकोळ बाजारातील दरांच्या दांडगाईवर राज्य सरकारला अद्याप नियंत्रण मिळवता आले नाही. कांद्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या घसरणीनंतरही किरकोळ बाजारातील नफेखोरीमुळे हा प्रकार पुन्हा एकदा पुढे आला आहे. सरकारच्या स्वस्त विक्री योजना केंद्रांवर चांगला कांदा ३८ रुपयांनी उपलब्ध असला तरी किरकोळ बाजारातील दरांची दांडगाई कायमच आहे. त्यामुळे १२६ केंद्रे सुरू करून किरकोळ बाजारात हस्तक्षेप करणे सरकारला जमलेले नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागले आहे.
दरम्यान, कांद्याचे दर एकीकडे कमी होत असले तरी राजस्थानमधून येणाऱ्या लसणाची आवक कमी झाल्यामुळे त्याचे भाव किलोमागे ८० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. काल-परवापर्यंत १० रुपये किलोने विकला जाणारा उत्तम प्रतीचा बटाटाही २० रुपयांपर्यंत महागला असून, किरकोळ बाजारात त्याचे दर २५ रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकांदाOnion
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price comes to rs 35 from rs 60 in one week
First published on: 19-11-2013 at 06:54 IST