धनगरसमाजातील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमुळेच मुख्यमंत्रिपद मिळाले. देशात उपेक्षित व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षातच असल्याचे प्रतिपादन कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी सोलापुरात केले.
कर्नाटकात भाजपचे सरकार पाडून काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवून दिल्याबद्दल व कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिध्दरामय्या यांचा सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जुळे सोलापुरात वि. गु. शिवदारे महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सिध्दरामय्या बोलत होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे अध्यक्षस्थानी होते. उपेक्षितांना आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्रित येऊन संघर्ष केला तर निश्चितपणे यश मिळते, असा विश्वासही सिध्दरामय्या यांनी यावेळी व्यक्त केला.
या वेळी कर्नाटकाचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील, खासदार व्ही. हणमंतराव, तसेच विजापूर जिल्ह्य़ातील शिवानंद गौडा पाटील, यशवंत गौडा पाटील, मकबूल बागवान, एन. बी. पाटील, राजू अलगूर या आमदारांचाही सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.