दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या ‘कल्पवृक्ष’ या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे गुरुवारी दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमास गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, खा. समीर भुजबळ, बबन घोलप, अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, जयंत जाधव या आमदारांसह भास्कर कोठावदे, जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे, त्र्यंबक गायकवाड, लालचंद जैन हे उपस्थित राहणार आहेत. १४ सप्टेंबर १९६१ रोजी अवघ्या दोन लाख ३५ हजार रकमेच्या ठेवींनी सुरू झालेल्या या बँकेच्या ठेवी जानेवारी २०१३ अखेर २७९ कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत. कर्ज १८० कोटींचे आहे. बँकेने सरकारी रोखे व इतर बँकांमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली असून वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळविण्यात सातत्य राखले आहे. बँकेच्या १९ शाखा कार्यरत आहेत. घरकर्ज १० टक्के व्याजदराने, तर तातडीच्या गरजेसाठी सोने तारण कर्ज १२ टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. बँकेकडून वसंत व्याख्यानमालेसारखे उपक्रमही दरवर्षी राबविण्यात येतात. एटीएम, कोअर बँकिंग या अत्याधुनिक सुविधा खातेदारांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे, बँकेस शेडय़ूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी दिली.