स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षांचे औचित्य साधून दिशा डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी रोजी ‘सृजन वाक्यज्ञ २०१३’ या खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते नववी असे पाच गट, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक-पालक आणि ज्येष्ठ नागरिक अशा आठ गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. सहभागी स्पर्धकांना आपल्या आवडत्या विषयावर चार अधिक एक मिनिटे बोलायचे आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क असणार नाही. सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र व पुस्तिका देण्यात येणार आहे. सर्वात जास्त विद्यार्थी सहभाग नोंदविणाऱ्या शाळेस दीड हजार रुपयांचे ग्रंथभेट देण्यात येणार आहे.
‘बीएमसीसी’मध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळात ही स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांसमवेत येणारे पालक त्याचप्रमाणे आयुष्यात पहिल्यांदाच भाषण करू इच्छिणाऱ्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात येणार आहे. विद्यार्थी यादी पाठविण्याची २० फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेतील सहभाग नोंदविण्यासाठी मयूर कर्जतकर (९०११०१७९१८ / ७२७६५४८५८४), वासंती कुलकर्णी (७७९८७७४३२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक प्रा. गणेश राऊत यांनी केले आहे.