सर्वसाधारण सभेत बोलू दिले जात नाही म्हणून विरोधी नगरसेविका आता शहराच्या विविध भागात जाऊन बैठका घेऊन नगरपालिकेच्या कारभाराचा पंचनामा करणार आहेत.
पालिकेत काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे एकतर्फी बहुमत असून विरोधी राष्ट्रवादीच्या भारती कांबळे, मंजुश्री मुरकुटे, निर्मला मुळे, रजियाबी जहागिरदार या नगरसेविका आहेत. त्या पालिका सभेत नेहमी आवाज उठवितात पण सत्तारूढ काँग्रेस पक्षाकडून त्यांना अडथळे आणले जातात. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी सभात्याग करून या प्रकाराचा निषेध नोंदविला.
स्थायी समितीच्या बैठकीत अनेक नियमबाह्य कामाचे निर्णय घेतले जातात. विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येते. सर्वसाधारण सभेत आयत्यावेळी विषय घालून ते बहुमताच्या जोरावर मंजूर केले जातात. आयत्यावेळचे विषय हे सत्तारूढ गटाच्या लाभाचे विषय असतात, अशी महिला नगरसेविकांची तक्रार आहे.
राज्य सरकारने १ फेब्रुवारी २०१३ पासन ई-टेंडरींग सुरू केले असून पालिकेने स्थायी समितीच्या बैठकीत टेंडर काढले. गैरप्रकार करण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले त्यामुळे आता पालिकेच्या कारभाराचा पंचनामा हा भागाभागात जाऊन करण्यात येईल, असे विरोधी नगरसेविकांनी पत्रकात नमूद केले आहे.