भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजलअंतर्गत जिल्हय़ातील सुमारे ३४ अपूर्ण नळयोजनेच्या कामाची सविस्तर माहिती पंचायत राज्य समितीने मागवली. त्यामुळे पाणीपुरवठा समितीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी समितीला काम पूर्ण करण्यास बजावले.
पाणीटंचाई निवारणाच्या नावाखाली विविध योजनांमधून जिल्हय़ात पाणीयोजनेची कामे घेण्यात आली. त्यातील जलस्वराज्यसारख्या योजनेचा कोटय़वधींचा निधी पाण्यात गेला. राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण योजना तसेच अंतर्गत नळयोजनांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात दोन वर्षांच्या मुदतीत काम पूर्ण करायचे होते. यात सेनगाव तालुक्यातील २० व हिंगोली तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. या गावांतील नळयोजनेची कामे प्रत्येकी सुमारे २० ते ५० लाख रुपये खर्चातून होणार आहेत. यासाठी सुरुवातीच्या तीन टप्प्यांत ३० टक्क्यांप्रमाणे व शेवटी १० टक्के निधी देण्यात येतो. तीन ते चार वेळा निधी देऊनही नळयोजनेची कामे अपूर्णच आहेत. या अपूर्ण कामांची माहिती पंचायत राज्य समितीकडून मागवण्यात आली. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या त्या गावच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्षांना पत्र पाठवून दोन महिन्यांत अपूर्ण कामे पूर्ण करण्यास बजावले.